काेराेनामुळे एकला चलो रे; सर्वांत व्यस्त हवाई मार्गाला प्रवाशांची प्रतीक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जगातील व्यस्त हवाई मार्गांपैकी एक असलेल्या मुंबई-दुबई मार्गावरून उड्डाण घेणारी विमाने सध्या प्रवाशांच्या शोधात आहेत. बुकिंग न मिळाल्याने ३६० सीटर विमान केवळ एका प्रवाशाला घेऊन मार्गस्थ झाल्याची घटना ताजी असतानाच आणखी एका विमानाने एकमेव प्रवेशासह उड्डाण केल्याची माहिती समोर आली आहे.
काेराेनाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त अरब अमिरात प्रशासनाने भारतीय प्रवाशांवरील बंदी १४ जूनपर्यंत वाढविल्याने या मार्गावरील प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. केवळ यूएईचे नागरिक, गोल्डन व्हिसाधारक आणि शासकीय मोहिमेवर असलेल्यांनाच प्रवेश दिला जात आहे. २२ मे रोजी एअर इंडियाच्या बोईंग ७८७ ड्रीमलाईनर विमानाची मुंबई-दुबई फेरी नियोजित होती. परंतु, एकच बुकिंग मिळाल्याने त्या प्रवाशाला घेऊन २५६ सीटर विमान रवाना झाले.
ओसवाल्ड रॉड्रिग्ज असे या प्रवाशाचे नाव आहे. एअर इंडियाच्या घोषवाक्याप्रमाणे ‘महाराजा’ असल्याची प्रचिती मला सर्व विमान कर्मचाऱ्यांनी दिली. मी विमानात पाऊल ठेवताच टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. स्वतः वैमानिक मला भेटण्यासाठी आला. सर्व सूचना देताना माझे नाव पुकारण्यात आले, हे विशेष. माझ्या सेवेत कोणतीही कसूर सोडण्यात आली नाही, अशी प्रतिक्रिया रॉड्रिग्ज यांनी माध्यमांना दिली.
रॉड्रिग्ज हे संयुक्त अरब अमिरातीचे गोल्डन व्हिसाधारक असून, एका उद्योग समूहाचे सहसंचालक आहेत. वडील आजारी असल्याने ते भारतात आले होते. १० दिवसांच्या मुक्कामानंतर त्यांनी दुबईला परतण्याचा निर्णय घेतला. परतताना त्यांना केवळ ३८ हजार रुपयांत या राजेशाही प्रवासाचा अनुभव घेता आला.
* विमान चुकणार होते, पण...
रॉड्रिग्ज दुपारी १.१५ वाजता मुंबई विमानतळावर दाखल झाले. विमान दुपारी ३.३० वाजता मार्गस्थ होणार होते; पण त्यांच्या कोरोना अहवालावरील क्यूआर कोड स्कॅन होत नसल्याने पंचाईत झाली. पुन्हा चाचणी करण्याची सूचना करण्यात आली. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ त्यांना लॅबमध्ये नेले. तेथे ४५०० रुपये भरून जलद अहवाल मिळविला. इमिग्रेशनची प्रक्रिया तातडीने पूर्ण केली. इतर सर्व कागदपत्रांची तपासणी जलदगतीने केली. विमान सुटण्याच्या काही मिनिटे आधी ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्याने विमान कर्मचाऱ्यांसह रॉड्रिग्ज यांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला.
......................................