डीजीचे आणखी एक पद रिक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2021 07:53 AM2021-02-03T07:53:49+5:302021-02-03T07:55:55+5:30
राज्य पोलीस दलातील महासंचालक दर्जाचे आणखी एक पद रिक्त झाले आहे. पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाचे कार्यकारी संचालक बिपीन बिहारी ३१ जानेवारीला सेवानिवृत्त झाले आहेत.
- जमीर काझी
मुंबई : राज्य पोलीस दलातील महासंचालक दर्जाचे आणखी एक पद रिक्त झाले आहे. पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाचे कार्यकारी संचालक बिपीन बिहारी ३१ जानेवारीला सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या जागी अद्याप कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही. आणखी काही दिवस हे पद रिक्तच ठेवले जाण्याची शक्यता गृह विभागातील सूत्रांनी वर्तवली.
राज्य पोलीस प्रमुखपदाचा अतिरिक्त कार्यभार महिन्यापासून हेमंत नगराळे यांच्याकडे आहे. तर सुरक्षा महामंडळाच्या कार्यकारी संचालक पदाचा कार्यभार डिसेंबरपासून संजय पांडेय यांच्याकडे आहे. या पदावरून अनुक्रमे सुबोध जयसवाल केंद्रात प्रतिनियुक्तीवर गेले तर डी. कनकरत्नम नोव्हेंबरमध्ये सेवानिवृत्त झाले. त्यानंतर ‘पोलीस हौसिंग’ची रिकामी पदामध्ये भर पडली.
रिक्त पदे टप्प्याटप्प्याने भरण्याचे धोरण
राज्य सरकारने रिक्त पदे टप्याटप्याने भरण्याचे धोरण अंवलबिले आहे. बिहारी हे १ जून २०१८ पासून पोलीस गृहनिर्माण विभागाचे प्रमुख होते. ते निवृत्त झाल्याने काही दिवसांसाठी अप्पर महासंचालक प्रज्ञा सरवदे यांच्याकडे ठेवला जाण्याची शक्यता आहे. पोलीस महासंचालक पदाच्या पदोन्नतीसाठी १९८८ च्या आयपीएस तुकडीचे अप्पर महासंचालक डॉ. के. व्यंकटेशम, तर त्याच्यानंतर १९९९ च्या बॅचचे संदीप बिष्णोई, ठाण्याचे आयुक्त विवेक फणसाळकर, पोलीस वाहतूक महामार्गचे प्रमुख डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांचा क्रमांक आहे.