मुंबई : वरळी येथील महापालिकेच्या कोल्डमिक्स प्लांटमध्ये ८७ जागा रिक्त असल्याची माहिती माहिती अधिकारामध्ये समोर आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये कोल्डमिक्सचे कमी उत्पादन झाले असल्याची माहितीही समोर आली आहे. यामुळे रस्त्यांवरचे खड्डे भरले जात नसून खड्डे भरलेल्या कोल्डमिक्सची गुणवत्ताही चांगली नसल्याची चर्चा सुरू आहे.
महापालिकेच्या कक्षेत सुमारे दोन हजार किलोमीटर रस्ते आहेत. पालिकेने रस्ते बांधकामांसाठी एक हजार कोटींपेक्षा जास्त अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली आहे. दरवर्षी रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी सुमारे शंभर कोटी खर्च केले जातात. याआधी खड्डे भरण्यासाठी हॉटमिक्सचा वापर केला जात होता़ २०१८ सालानंतर खड्डे भरण्यासाठी कोल्डमिक्स वापरण्यात येतो. वरळीतील प्लांटमध्ये हॉटमिक्स आणि कोल्डमिक्स तयार केले जाते. माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी धूम्रजतु प्लांट कार्यालयाकडून प्लांटमध्ये मंजूर झालेल्या कर्मचाऱ्यांची माहिती आणि उत्पादन क्षमता यासंदर्भात माहिती मागितली होती. यामध्ये वरळी प्रकल्पातील एकूण १२८ रिक्त जागा मंजूर झाल्या आहेत. परंतु सध्या केवळ ४१ कर्मचारी कार्यरत आहेत, अशी माहिती मिळाली. म्हणजेच अद्याप ८७ पदे रिक्त आहेत. दिवसाला किमान उत्पादन क्षमता ५० मेट्रिक टन आहे़ कोल्डमिक्सचे अत्यल्प प्रमाण तयार केले जात आहे़ प्लांटमध्ये दररोज किमान उत्पादन क्षमता ५० मेट्रिक टन आहे. मात्र कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे दररोज सरासरी १०.२० मे.टन कोल्डमिक्स तयार होत आहे.वरळी प्लांटमध्ये कोल्डमिक्सचे उत्पादन कमी असल्याने मुंबईच्या रस्त्यांवरचे खड्डे भरले जात नाहीत, असे शकील अहमद शेख यांचे म्हणणे आहे. कोल्डमिक्सदेखील निकषानुसार तयार करण्यात येत नाही़ कोल्डमिक्सची गुणवत्ता खूपच खराब असल्याचेही ते म्हणाले.