Parambir Singh: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात आता आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील गोरेगाव पोलीस ठाण्यात एका व्यापाऱ्यानं वसूलीसंदर्भात तक्रार दाखल केली आहे. शुक्रवारी रात्री या गुन्ह्याची नोंद झाली आहे.
विमल अग्रवाल नावाच्या हॉटेल व्यावसायिकानं दाखल केलेल्या तक्रारीत परमबीर सिंग यांच्यासह सचिन वाझे, सुमित सिंह उर्फ चिंटू, अल्पेश पटेल, विनय सिंह उर्फ बबलू आणि रियाझ भाटी यांची नावं नमूद केली आहेत. या सर्वांविरोधात खंडणीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
जानेवारी-फेब्रुवारी २०२० ते मार्च २०२१ दरम्यान आरोपींनी विमल अग्रवाल यांच्याकडून ९ लाख रुपये रोख आणि सॅमसंगचे दोन महागडे फोन खंडणी म्हणून वसूल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. एकूण मिळून ११ लाख ९२ हजारांची खंडणी घेण्यात आल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.
नेमकं प्रकरण काय?गोरेगाव येथील विमल अग्रवाल यांनी सचिन वाझे आणि परमबीर सिंग यांच्याविरोधात खळबळजनक आरोप केले आहेत. "जानेवारी-फेब्रुवारी २०२० च्या दरम्यान पोलीस अधिकारी सचिवा वाझे हे माझे मालाड येथील ऑफीसमध्ये येऊन मला भेटले. त्यावेळी त्यांनी मला सांगितले की माझे खास बॉस परमबीर सिंग मुंबईमध्ये सीपी म्हणून येणार आहेत. तू तुझा हॉटेल व्यवसाय पुन्हा चालू कर, बाकी मी बघून घेतो. कलेक्शनचे काम माझ्याकडेच सोपवलं जाणार आहे. मी तुझा सेटअप करून देतो. त्याचवेळी माझा मित्र अनिकेत पाटील व त्याचे इतर भागीदार यांचे गोरेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये BOHO बार आणि रेस्टॉरंट्स नावाने हॉटेल सुरू होते. पण कोविड लॉकडाऊनमुळे आमचे हॉटेल बंद झाले होते. ते चालू ठेवण्यासाठी सचिन वाझे आणि दुसऱ्या आरोपींना माझ्याकडून ९ लाख रुपये आणि सॅमसंग कंपनीचा फोल्ड २ मोबाइल हप्ता म्हणून घेतले होते" असं विमल अग्रवाल यांनी तक्रारीत नमूद केलं आहे.