मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी मनी लाँड्रिंग प्रकरणात मृत गँगस्टर इक्बाल मिर्ची याच्या कुटुंबाची आणखी २२.४२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. यात विविध सात बँक खात्यांतील ठेवींसह पाचगणीतील सिनेमा हॉल, मुंबईतील हॉटेल, फार्महाउस, दोन बंगले आणि भूखंड आदींचा समावेश असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मालमत्तेवर टाच आणण्याचे आदेश मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये (पीएमएलए) जारी केले. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी इक्बाल मिर्चीचे लंडनमध्ये २०१३ मध्ये निधन झाले. त्याने ड्रग्ज तस्करी व हवालामार्फत कोट्यवधीची माया देश-विदेशात जमवली. मुंबईसह देशात विविध ठिकाणी रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक केल्याचे उघडकीस आल्यानंतर ईडीने दीड वर्षापूर्वी त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध गुन्हा दाखल केला. आतापर्यंत त्याची सुमारे ८०० कोटींची मालमत्ता ताब्यात घेतली. त्याची पत्नी व मुलाविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.