वादळी चर्चेची शक्यता
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खर्च झालेल्या कोट्यवधी रुपयांचा हिशोब स्थायी समितीने मागवला असताना महापालिका प्रशासनाने मार्च २०२१ पर्यंत आणखी चारशे कोटी रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव आणला आहे. यासाठी अर्थसंकल्प ‘अ’ अंतर्गत उपलब्ध असलेल्या ११९४.४२ कोटी वार्ताळ्यामधून ४०० कोटींचा निधी आकस्मिक निधीत वर्ग करण्याचे प्रस्तावित आहे. मात्र आतापर्यंतच्या खर्चाचा हिशोब प्रशासनाने न दिल्यामुळे या विषयावर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.
मार्च २०२० पासून मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून पालिका यंत्रणा दिवस-रात्र काम करीत आहे. कोरोना काळजी केंद्र, जम्बो केंद्रांची उभारणी, वैद्यकीय उपकरणांची खरेदी आदींसाठी आतापर्यंत १६३२.६४ कोटी रुपये आकस्मिकता निधीतून पालिकेने खर्च केले आहेत. मात्र कोरोनाविरुद्ध लढा अद्याप सुरूच असल्याने मार्च २०२१ पर्यंत आणखी चारशे कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. सध्या आकस्मिक निधीत केवळ २९.९३ कोटी रुपये शिल्लक असल्याने वार्ताळ्यामधून हा निधी आकस्मिक निधीत वर्ग करण्याची विनंती प्रशासनाने स्थायी समितीला केली आहे.
मात्र कोविडसाठी केलेल्या कोट्यवधीच्या खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप नगरसेवकांकडून केला जात आहे. या खर्चाची चौकशी करण्याचे निर्देश स्थायी समितीने लेखापरीक्षक यांना दिले आहेत. कार्योत्तर मंजुरीसाठी आलेल्या प्रस्तावांवर प्रशासनाने समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे स्थायी समितीने संबंधित प्रस्ताव राखून ठेवले आहेत. त्यामुळे स्थायी समितीच्या बुधवारच्या बैठकीत सादर होणारा नवीन खर्चाचा प्रस्ताव अडचणीत येण्याची शक्यता आहे.
* कोरोनाकाळात जम्बो सेंटर आणि कोरोना काळजी केंद्राची उभारणी, कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती, वैद्यकीय उपकरणांची खरेदी, बाधित क्षेत्रामध्ये धान्यपुरवठा आदी कामांसाठी महापालिकेने सुमारे १६०० कोटी रुपये खर्च केले आहेत.
* मास्क खरेदी, मृतांसाठी खरेदी करण्यात आलेले बॅग, व्हेंटिलेटर यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप भाजपने केला आहे. या खरेदीची चौकशी व्हावी यासाठी भाजपने निदर्शने केली होती.