पोलीस निरीक्षक सुनील माने एनआयएच्या ताब्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ॲंटिलिया निवासस्थानाजवळ सापडलेली स्फाेटकांनी भरलेली कार तसेच ठाण्याचे व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मुंबई पोलीस दलातील पोलीस निरीक्षक सुनील माने याला अटक केली. मुंबई पोलीस दलातील या प्रकरणात अटक होणारा ताे तिसरा पोलीस अधिकारी आहे. विशेष एनआयए न्यायालयाने मानेला २८ एप्रिलपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे.
एनआयएने निलंबित पाेलीस अधिकारी सचिन वाझेला स्फाेटक कारप्रकरणी १३ मार्चला अटक केली. त्यापाठोपाठ तपासाअंती वाझेचा गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागातील (सीआययू) सहकारी निलंबित सहायक पोलीस निरीक्षक रियाजुद्दीन काझीला ११ एप्रिलला अटक करण्यात आली. काझीची न्यायालयीन कोठडी संपत असतानाच एनआयएने पोलीस निरीक्षक सुनील मानेला याचप्रकरणी अटक केली. ताे कांदिवली गुन्हे शाखेत कार्यरत होता. तेथून त्याची सशस्त्र पोलीस दलात बदली करण्यात आली होती.
एटीएसनेही मानेकडे यापूर्वी चौकशी केली होती. ३ ते ५ मार्चदरम्यान माने सीआययूमध्ये ठाण मांडून असल्याची माहिती समोर आली आहे. ४ मार्चच्या रात्री मनसुख हिरेन हे तावडे नावाच्या अधिकाऱ्यास भेटण्यासाठी घोडबंदर परिसरात जातो, असे सांगून घरातून निघाले आणि बेपत्ता झाले. दुसऱ्या दिवशी मुंब्रा खाडी, रेती बंदर येथे त्यांचा मृतदेह आढळला होता. माने हा वाझेचा अत्यंत निकटवर्तीय समजला जाताे. एनआयएला दिलेल्या जबाबात मानेने सांगितले होते की, आयुक्त कार्यालयात ते आपल्या वैयक्तिक बंदुकीचा परवाना बनवण्यासाठी गेले होते. दोन बंदुकीसाठी परवाना हवा हाेता. दरम्यान, मनसुख यांना तावडे नावाने फोन करणारा विनायक शिंदे नसून माने असल्याचा दावा राष्ट्रीय पोलीस यंत्रणेने न्यायालयात केला आहे. हत्येच्या वेळीही माने तेथे उपस्थित असल्याचेही एनआयएने न्यायालयाला सांगितले.
वाझे, काझीच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
वाझे आणि काझीची न्यायालयीन कोठडी शुक्रवारी संपत असल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. दोघांच्याही न्यायालयीन कोठडीत ५ मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
....................................