मुंबई : एटीएसने अटक केलेल्या संशयित दहशतवादी फैझल मिर्झाच्या अटकेनंतर राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) आणखी एकाला गुजरातमधून अटक केली आहे. अल्लारखा (३२) असे त्याचे नाव असून, तो गुजरातच्या गांधीधाम येथील रहिवासी आहे. तो दुबईतील हॅण्डलरच्या संपर्कात होता.अल्लारखा याला न्यायालयाने २५ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्यावर गुजरातमध्ये दहशतवादी हल्ला घडविण्यासाठी आवश्यक असलेल्या स्फोटकांच्या वाहतुकीची जबाबदारी असल्याची माहिती समोर येत आहे. त्याच्याकडे या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. अल्लारखाच्या चौकशीतून तो दुबईतील हॅण्डलर फारुख देवडीवालाच्या सतत संपर्कात असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्याकडील महत्त्वपूर्ण दस्तावेज एटीएसने ताब्यात घेतला आहे. तो चालक म्हणून काम करतो.एटीएसच्या कोठडीत असलेल्या फैझलची कसून चौकशी सुरू आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार, संशयितांची धरपकड सुरू करण्यात आली आहे. यापैकी ट्रॉम्बेच्या चिता कॅम्प परिसरात राहणाऱ्या आणि राजकीय कनेक्शन असलेल्या एका सराईत गुन्हेगाराला एटीएसने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तर, उर्वरितांपैकी एक फैझलच्या अटकेनंतर दुबईला पसार झाला आहे. त्यामुळे त्याच्या कुटुंबाची चौकशी करण्यात येत आहे. आयएसआयने शकीलच्या माध्यमातून देशाच्या विविध राज्यांमधील तरुणांना पाकिस्तानात बोलावून दहशतवादी हल्ल्यांसाठी आवश्यक ते प्रशिक्षण दिल्याच्या संशयातून शकील टोळीच्या साथीदारांची धरपकड सुरू आहे. फैझलच्या कुटुंबीयांकडेही एटीएस चौकशी करीत आहे.>दुबईतून फारुख देवडीवालाला बेड्याछोटा शकीलचा साथीदार फारुख देवडीवाला याला दुबई पोलिसांनी अटक केली आहे. मात्र याबाबत एटीएसकडून अधिक माहिती देण्यात आलेली नाही. लवकरच फारुखला मुंबईत आणण्यात येणार असल्याचे समजते.
फैझलपाठोपाठ आणखी एक संशयित दहशतवादी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 6:37 AM