एटीएसकडून झाडाझडती सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : धारावीतून जान मोहम्मद अली शेख ऊर्फ समीर कालियाच्या अटकेनंतर राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) जोगेश्वरी भागातून जाकीर हुसेन शेखला अटक केली तर आता शेखपाठोपाठ एटीएसने मुंब्रा येथून रिझवान इब्राहीम मोमीन (४०) याला रविवारी ताब्यात घेत अधिक चौकशी सुरू केली आहे.
एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, ॲन्थोनी ऊर्फ अन्वर ऊर्फ अनस आणि शेख विरोधात बेकायदेशीर कृत्य करण्याचा कट आखण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १७ तारखेला गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापाठोपाठ शेख विरोधात लूक आउट नोटीस जारी करत त्याला १८ तारखेला अटक केली. शेख हा अंडरवर्ल्डशी संबंधित आहे. शेखचा भाऊ शाकीर शेख हा पाकिस्तानमध्ये असून, तो दाऊदचा भाऊ अनिस इब्राहिम याचा खास हस्तक आहे. शाकीरच्या माध्यमातून शेख हा अनिस इब्राहिमच्या सातत्याने संपर्कात होता. त्यामुळे तो मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्याही रडारवर सुरुवातीपासूनच होता. गुन्हे शाखेने एका प्रकरणात शेखला यापूर्वी अटक केली होती.
अनिस इब्राहिमच्या सांगण्यावरूनच शेख याने जान मोहम्मदला या दहशतवादी हल्ल्याच्या योजनेमध्ये सामील केले होते. त्यामुळे शेख हा अंडरवर्ल्डमधील स्लीपर सेल पद्धतीने काम करत असून, जान मोहम्मदला तो लॉजिस्टिक सपोर्ट देत असल्याचे एटीएसच्या तपासात समोर आले आहे. तसेच शेखच्या सांगण्यावरूनच जान मोहम्मद दिल्लीसाठी रवाना झाला होता, अशी माहिती मिळते आहे. सोमवारी न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर शेखपाठोपाठ या गुह्यांत मोमीनचा सहभाग समोर येताच, पथकाने रविवारी मुंब्रा येथून त्याला ताब्यात घेतले आहे. त्याच्या घरातूनही महत्त्वपूर्ण दस्ताऐवज जप्त केल्याचे एटीएसकडून सांगण्यात आले.
मोमीन घेत होता शिकवणी
शेखने मोमीनकडे दिलेल्या मोबाइलची विल्हेवाट लावण्यासाठी मोमीनने तो तोडून जवळच्या नाल्यात फेकला. रविवारी अथक प्रयत्नाने नाल्यातून तीन तुकड्यांंमध्ये मोबाइलचा शोध घेण्यास यश आले आहे. मोमीन हा मुंब्रा येथील चांदनगर येथील नुरी सोसायटीत भाड्याच्या घरात राहायचा. त्याने खासगी शिकवणी सुरू केली होती. याआधी तो मुंबईत शिक्षक म्हणून काम करायचा अशी माहिती मिळत आहे. त्याच्याकडे याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.