परदेशातून आलेला आणखी एक प्रवासी कोविड पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2021 11:47 PM2021-12-04T23:47:07+5:302021-12-04T23:47:21+5:30
मागील महिन्याभरात ओमायक्रॉन संक्रमित देशांतून तीन हजार १३६ प्रवासी मुंबईत आले आहेत. यापैकी दोन हजार १४९ प्रवाशांची कोविड चाचणी करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - ओमायक्रॉन संक्रमित देशांतून आलेल्या प्रवाशांची वेगाने चाचणी केली जात आहे. यापैकी आतापर्यंत कोरोना बाधित नऊ रुग्ण आढळून आले होते. आता आणखी एका प्रवाशाला कोरोना झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या सर्व दहा बाधितांचे नमुने जिनोम सिक्वेंसिंग चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत. याबाबतचा अहवाल पुढील दोन दिवसांत अपेक्षित आहे.
मागील महिन्याभरात ओमायक्रॉन संक्रमित देशांतून तीन हजार १३६ प्रवासी मुंबईत आले आहेत. यापैकी दोन हजार १४९ प्रवाशांची कोविड चाचणी करण्यात आली आहे. यापैकी आतापर्यंत दहा जणांना कोविड झाला आहे. पालिकेने नऊ रूग्णांची एस जीन चाचणी केली होती. यापैकी सात जणांची चाचणी निगेटीव्ह आल्यामुळे त्यांना ओमायक्रॉनची लागण होण्याची शक्यता कमी झाली आहे. मात्र खबरदारी म्हणून या सर्वांची जिनोम सिक्वेंसिंग चाचणी करण्यात आली असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.