मुंबई – अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणावरुन अमृता फडणवीस आणि शिवसेना यांच्यात पुन्हा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. सुशांत सिंग प्रकरण ज्याप्रकारे हाताळलं जात आहे त्यामुळे मुंबईत राहणं असुरक्षित वाटू लागलं आहे असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी म्हटलं होतं, त्यानंतर शिवसेना मंत्री अनिल परब यांनी थेट अमृता फडणवीसांना राज्य सोडण्याचा सल्ला दिला होता.
अमृता फडणवीस यांच्या ट्विटवर शिवसेनेच्या नेत्यांनी टीका केल्यामुळे आणखी एक ट्विट अमृता यांनी केले आहे. त्यात त्यांनी शायरीच्या माध्यमातून सुशांत सिंग राजपूत प्रकरणावर भाष्य करत शिवसेनेला नाव न घेता टोला लगावला आहे. अमृता फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की,
रहते हैं शीषमहलों में जो, वो अवाम से दूरी बनाया करते हैं !
मगर हम तो वो शक़्स हैं, जो पत्थरों से घर बनाया करते हैं !
भूल गए हैं वो कांच के घरो में रहकर ख़ुद, छुपाएं कुछ छुपता नहीं !
हम फरेबियोंको ठोकरों में,और सच को सीने से लगाया करते हैं !
यात त्यांनी जय श्रीराम म्हणत जस्टीस फॉर सुशांत, दिशा असं म्हटलं आहे. यापूर्वीही त्यांनी सुशांत प्रकरणात ट्विट करत म्हटलं होतं की, ‘सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास ज्या पद्धतीने हाताळला जात आहे, त्यावरून मला असे वाटते की मुंबईने माणुसकीच गमावली आहे. निष्पाप, स्वाभिमानी नागरिकांसाठी मुंबईत राहणे अजिबात सुरक्षित नाही, असं सांगितलं होतं. त्यावर युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी मॅडम, तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय याच मुंबई पोलिसांचे सुरक्षा कवच घेऊन त्यांच्यावरच इतके नीच आरोप करता? सोडून द्या की हे सुरक्षा कवच भरोसा नसेल तर !! असा पलटवार केला होता.
तर वरुण सरदेसाई यांनी तोंड सांभाळून बोलावे, आपण अद्याप छोटे आहात, कोणाबद्दल बोलतोय हे बघावं अन्यथा आम्हाला त्यांची कुंडली बाहेर काढायला वेळ लागणार नाही, आम्हाला तोंड कसं बंद करायचं हे माहिती आहे असा इशारा भाजपा नेते नारायण राणे यांनी दिला होता.