Join us

मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2024 3:19 PM

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटची दिवशी आज मुंबई उत्तर मध्य या लोकसभा मतदारसंघात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.

Lok Sabha Election ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीचा प्रचार जसजसा पुढे सरकत आहे, तसतशी महाराष्ट्रात राजकीय रंगत वाढत चालली आहे. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीकडूनही उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटची दिवशी आज मुंबई उत्तर मध्य या लोकसभा मतदारसंघात असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएम पक्षानेही उमेदवाराची घोषणा केली आहे. रमजान चौधरी हे आमचे उमेदवार असतील, अशी माहिती एमआयएमचे माजी आमदार वारीस पठाण यांनी दिली आहे. 

मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी अनेक आठवड्यांपासून सर्वच राजकीय पक्षांमध्ये खल सुरू होता. महाविकास आघाडीच्या जागावाटपात ही जागा काँग्रेसला सुटल्यानंतर काँग्रेसने इथून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली. त्यांच्याविरोधात भाजपकडून कोण मैदानात उतरणार, याबाबत उत्सुकता होती. अखेर भाजपने या जागेवर धक्कातंत्राचा अवलंब करत ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांना मैदानात उतरवलं. त्यानंतर आता एमआयएमनेही रमजान चौधरी यांची उमेदवारी जाहीर केल्याने मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे.

वर्षा गायकवाड यांच्यासमोरील आव्हान खडतर

काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर या मतदारसंघातून लढण्यास इच्छुक असलेले काँग्रेस नेते नसीम खान यांनी जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली. तसंच त्यांनी काँग्रेसच्या स्टार प्रचारकपदाचा राजीनामाही दिला. नसीम खान यांची समजूत काढण्याचा प्रयत्न काँग्रेस नेत्यांकडून सुरू असताना नुकतीच एमआयएमने खान यांना उमेदवारीची ऑफर दिली होती. मात्र त्याबाबत खान यांनी निर्णय न घेतल्याने आता एमआयएमने रमजान चौधरी यांच्या नावाची घोषणा केली आहे. चौधरी यांच्या उमेदवारीमुळे मुस्लीम मतांचं विभाजन होऊन भाजप उमेदवाराला फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे वर्षा गायकवाड यांच्यासमोर आव्हान कठीण झाल्याची चर्चा आहे.

दरम्यान, "महाविकास आघाडी या मतदारसंघात मुस्लीम उमेदवाराला संधी देईल, अशी आम्हाला आशा होती. मात्र मविआने तो निर्णय न घेतल्याने आम्ही उमेदवाराची घोषणा केली," असा दावा वारीस पठाण यांनी केला आहे.

टॅग्स :उज्ज्वल निकमवर्षा गायकवाडमुंबई उत्तर मध्यमहाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४लोकसभा निवडणूक २०२४