वेसाव्यात शिपीलच्या तराफ्यातून गणपती विसर्जनाची आगळी वेगळी परंपरा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 04:13 PM2019-09-11T16:13:42+5:302019-09-11T17:08:37+5:30
अंधेरी पश्चिम रेल्वे स्थानकापासून 7 किमी अंतरावर असलेल्या वेसावे कोळीवाडयाची गणेश विसर्जनाची एक आगळी वेगळी परंपरा आहे.
- मनोहर कुंभेजकर
मुंबई- केरळ नंतर देशात मासेमारीत दुसरा क्रमांक असणाऱ्या अंधेरी पश्चिम रेल्वे स्थानकापासून 7 किमी अंतरावर असलेल्या वेसावे कोळीवाडयाची विसर्जनाची एक आगळी वेगळी परंपरा आहे. येथील मांडवी गल्ली कोळी जमात उद्याच्या विसर्जन सोहल्यासाठी सज्ज झाली आहे. अनंत चतुर्थीला पश्चिम उपनगरातील सुमारे 125 मोठ्या गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाते.येथील विसर्जनासाठी चार होड्यांचा एक तराफा केला जातो.असे दोन तराफे तयार करण्यात आले असून येथील विसर्जनावर देखरेख ठेवण्यासाठी खास 4 बोटी देखिल तैनात करण्यात आल्या आहेत.आणि येथील विसर्जन सोहळा दुसऱ्या दिवशी दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू असतो.
येथे शिपील (छोट्या बोटी)च्या तराफ्यातून मधून विसर्जनाची आगळी वेगळी व देखणी परंपरा आहे. येथील मांडवी गल्ली कोळी जमातीच्या वतीने लहान मूर्तीपासून ते मोठ्या गणेश मूर्तींचे येथील खोल समुद्रात विसर्जन केले जाते. येथील नेत्रदीपक विसर्जन सोहळा केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशात एकमेव असा विसर्जन सोहळा असल्याचे मांडवी गल्ली कोळी जमातीचे अध्यक्ष जगदीश भिकरू व सचिव व मनोज कास्कर यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.
येथील आगळ्या वेगळ्या गणपती विसर्जनाची वेसावकरांची जुनी परंपरा आहे. 1995 पूर्वी येथील बाजार गल्ली कोळी जमातीतर्फे गणपती विसर्जन केले जात होते. मात्र 1995 पासून येथील मांडवी गल्ली कोळी जमातीच्या वतीने पाच, सात दिवसांचे सुमारे 25 ते 30 गणेश मूर्ती आणि अनंत चतुर्थीला पश्चिम उपनगरातील सुमारे 125 गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाते.
तराफ्यावर फळी ठेऊन त्यावर गणपतीची मूर्ती ठेवली जाते. मग वेसावे येथील खोल समुद्रात फळीवरील ठेवलेल्या गणेश मूर्तीला कोणताही धक्का न लागता विसर्जन केले जाते. या विसर्जनाच्या कार्यात या जमातीचे सुमारे 300 कार्यकर्ते येथील विसर्जन सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी झटत असतात.
दुसऱ्या दिवशी दुपारी 4 वाजेपर्यंत सुमारे 24 तास येथील विसर्जन सोहळा सुरूच असतो अशी माहिती मांडवी गल्ली कोळी जमातीचे सचिव मितेष चाके व खजिनदार नरेश कोळी यांनी शेवटी दिली.