Join us

मुंबईत आणखी एक वॉर्ड; ‘के-उत्तर’ अस्तित्वात : आता एकूण वॉर्डची संख्या २६ 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2024 10:04 AM

नव्या वॉर्डामुळे आता एकूण वॉर्डांची संख्या २६ झाली आहे...

मुंबई : मुंबई महापालिकेच्या हद्दीत आता ‘के उत्तर’ या आणखी एका वॉर्डची भर पडली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना  नजीकच्या विभाग कार्यालयात नागरी सेवा-सुविधांचा लाभ घेता येईल.  नव्या वॉर्डामुळे आता एकूण वॉर्डांची संख्या २६ झाली आहे. 

शामनगर तलाव, मेघवाडी, सर्वोदय नगर, शेर ए पंजाब वसाहत, जलाशय, जोगेश्वरी गुंफा, महाकाली गुंफा, जोगेश्वरी रेल्वे स्थानक पूर्व परिसर या आठ प्रभागांचा या प्रशासकीय विभागात समावेश असून, तेथील लोकसंख्या अंदाज चार लाखांहून अधिक आहे. वॉर्डाच्या १० मजली इमारतीमध्ये तळ मजल्यावर नागरी सुविधा केंद्र, तर तिसरा, चौथा आणि पाचवा मजला याठिकाणी के-उत्तर विभागाचे कार्यालय असणार आहे. या वॉर्डाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले. संपूर्ण क्षमतेने नागरी सेवा पुरविणारे प्रशासकीय विभाग कार्यालय नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध झाले आहे. प्रशासकीय विभागांच्या फेररचनेतून नव्याने तयार झालेल्या के-उत्तर प्रशासकीय विभागाद्वारे संपूर्ण क्षमतेने आणि सर्व प्रकारच्या नागरी सेवा-सुविधा पुरविण्यात येणार आहेत. विभाग कार्यालयांच्या माध्यमातून नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधेत यामुळे भर पडेल, असे प्रतिपादन शिंदे यांनी केले. के-उत्तर इमारतीच्या कोनशिलेचे अनावरणही त्यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार रवींद्र वायकर, के-पूर्वच्या सहायक आयुक्त मनीष वळंजू उपस्थित होते. 

मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यामुळे खड्डेमुक्त रस्ते मुंबईतील नागरिकांना अनुभवायला मिळत आहेत. मुंबई सुशोभीकरण प्रकल्पातून नागरिकांना, तसेच पर्यटकांना सर्वोत्तम अनुभव मिळाला आहे, असेही शिंदे म्हणाले. तर, आपल्या नजीकच्या परिसरात विभाग कार्यालय असावे, ही स्थानिकांची मागणी पूर्ण झाल्याने नव्या सुविधेमुळे नागरिकांचे श्रम आणि वेळ यात बचत होणार आहे, असे वायकर म्हणाले.  

टॅग्स :मुंबई महानगरपालिका