'आणखी किती मेजर राणेंचे बलिदान घेणार, याचे उत्तर द्या, मगच निवडणुका लढवा'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2018 09:20 AM2018-08-11T09:20:19+5:302018-08-11T11:28:14+5:30
मीरा रोड येथील भाजप नेत्यांनी साजरा केलेल्या वाढदिवसाचाही समाचार सामनातून घेण्यात आला आहे. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा करताना मेजर कौस्तुभ राणेंना वीरमरण प्राप्त झाले होते.
मुंबई - शिवसेना पक्षप्रुमख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखातून मोदी सरकारवर कडाडून टीका केली. काश्मीर खोऱ्यातील दहशतवादावरुन उद्धव यांनी भाजपला लक्ष्य केले आहे. आणखी किती मेजर राणेंचे बलिदान घेणार अगोदर याचे उत्तर द्या, मगच 2019 च्या निवडणुकांना सामोरे जा, अशी सूचनाच सामनाच्या संपादकीयमधून करण्यात आली. तसेच मीरा रोड येथील भाजप नेत्यांनी साजरा केलेल्या वाढदिवसाचाही समाचार सामनातून घेण्यात आला आहे. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा करताना 8 ऑगस्ट रोजी मेजर कौस्तुभ राणेंना वीरमरण प्राप्त झाले आहे.
शिवसेनेने शहीद जवान कौस्तुभ राणेंच्या बलिदानावरुन मोदी सरकारला लक्ष्य केले. सैनिकांच्या हौतात्म्याची तरी जुमलेबाजी करू नका. सैनिकांच्या बलिदानानंतर डी.जे. वाजवून गोंधळ घालणाऱ्यांचे राज्य आम्हाला नकोय, तसे नक्राश्रू ढाळणाऱ्यांचेही नको! मग कुणी काय समजायचे ते समजो, असा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावले आहे. मेजर राणे देशासाठी जन्मास आला, देशासाठी जगला व देशासाठीच हुतात्मा झाला. मेजर राणेसह तीन जवान कश्मीरात पुन्हा शहीद झाले. फक्त निवडणुका जिंकण्यातच मग्न असलेल्या राज्यकर्त्यांनी शरमेने मान खाली घालावी असे पाकडे तांडव कश्मीरात सुरू आहे. तर शेजारी एक जवान शहीद झाल्याचे भान नसणारी बधिरताच रोज आमच्या तरुण पोरांचे बळी घेत आहे. वाटेल त्या मार्गाने निवडणुका जिंकणे म्हणजे शौर्य नसून देशासाठी मरण पत्करणे हेच खरे शौर्य आहे, असा सणसणीत टोला उद्धव यांनी लगावला आहे.
महाराष्ट्रात सांगली, जळगाव जिंकले व राज्यसभेत उपसभापतीपद जिंकले, पण कश्मीरातील दहशतवादावर निर्णायक विजय कधी मिळवणार? आणखी किती मेजर राणेंचे बळी घेणार, असा प्रश्नही उद्धव यांनी विचारला आहे. तर जवानाच्या हौत्मात्याचे भान नसलेल्या भाजपच्या बर्थ डे पार्टीवरुनही सरकारला लक्ष्य केले आहे. देशाचा ‘जीडीपी’ की काय तो वाढायचा तेव्हा वाढेल, पण त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि सैनिकांची बलिदाने कमी होणार आहेत काय? पैसा फेकून, ई.व्ही.एम. बंद पाडून निवडणुका जिंकणे आता सोपे आहे, पण ‘कौस्तुभच काय, आणखी मुले असती तर तीदेखील देशासाठी दिली असती,’ असे सांगणाऱ्या शहीद कौस्तुभच्या पित्याची हिंमत बाजारात मिळत नाही. ती विकत घेता येत नाही, अशा भावनिक आणि जहाल शब्दात उद्धव यांनी मोदी सरकारला लक्ष्य केले.