अंनिसचे देशभरात ‘जवाब दो’ आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2018 06:13 AM2018-08-07T06:13:13+5:302018-08-07T06:13:33+5:30
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला २० आॅगस्ट रोजी ५ वर्षे पूर्ण होत आहेत.
मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला २० आॅगस्ट रोजी ५ वर्षे पूर्ण होत आहेत. ५ वर्षे होऊनही दाभोलकरांच्या खुनाच्या तपासात समोर आलेल्या साक्षी-पुराव्यांच्या बळकटीसाठी आवश्यक ठोस पुरावे गोळा करणे तसेच फरार गुन्हेगारांना अटक करण्यात तपास यंत्रणांना यश आलेले नाही. या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकाराने आणि समविचारी पक्ष, संघटना, संस्थांच्या सहभागाने ‘जवाब दो’ आंदोलन संपूर्ण देशभरात अधिक सक्षमपणे करण्यात येणार आहे.
महाराष्ट्राबरोबरच दिल्लीतही ‘जवाब दो’ आंदोलन करण्यात येईल. केरळ, पंजाब, हरियाणा, पश्चिम बंगाल, राजस्थान, मध्य प्रदेशसह आणखी १५ राज्यांमध्ये हे आंदोलन केले जाईल. सोबतच २० आॅगस्ट हा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा स्मृतिदिन यापुढे ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टीकोन दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. भारतातील २२ राज्यांमधून विज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेल्या चाळीस प्रमुख संस्था, संघटनांच्या सहभागाने गठीत झालेल्या आॅल इंडिया पीपल सायन्स नेटवर्कमार्फत हा निर्णय घेण्यात आला आहे. सोबतच डॉ. दाभोलकर यांचा वाढदिवस म्हणजेच २१ सप्टेंबरला ‘चमत्कार सत्यशोधन दिन’ महाराष्ट्र अंनिसच्या पुढाकाराने साजरा करण्यात येईल.
या दिवशी ‘सर्वांगीण मानवी विकासासाठी वैज्ञानिक दृष्टीकोन-संवाद व प्रबोधन अभियान’ राबविले जाईल. महाराष्ट्र अंनिसच्या युवा सहभाग विभागाच्या पुढाकाराने महाविद्यालयीन व विद्यापीठस्तरीय युवा संकल्प मेळावेही आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये कोणत्याही प्रश्नांची सोडवणूक करताना व अन्यायाशी संघर्ष करताना अहिंसक आणि संवैधानिक मार्गानेच कृती करण्याचा संकल्प युवक, युवती, विद्यार्थ्यांकडून केला जाणार आहे.