Video: दहावीच्या निकालानंतर विलासरावांची आठवण, लातूर पॅटर्नवरील टीकेला दिलतं 'हे' उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 10:22 PM2020-07-29T22:22:33+5:302020-07-29T22:28:54+5:30
राज्याचा विभागवार निकाल पाहता, त्यात लातूर शेवटून दुसऱ्या क्रमांकावर आहे. लातूर विभागाचा निकाल ९३.०९ टक्के इतका लागला आहे. मात्र १०० टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यादीत लातूर विभागानं पहिला क्रमांक पटकावला आहे.
मुंबई - राज्य शिक्षण मंडळाने मार्च महिन्यात घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून, राज्यात राज्यात एकूण ९५.३० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. यावर्षीच्या निकालांमध्येही मुलांपेक्षा मुलींनीच बाजी मारली असून, मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचा टक्का हा तीन टक्क्यांनी अधिक आहे. विभागवार निकालामध्ये कोकण विभागाने पुन्हा एकदा बाजी मारली असून, कोकण विभागाचा निकाल ९८.७७ टक्के एवढा लागला आहे. सर्वात कमी निकाल औरंगाबाद विभागाचा लागला असून, या विभागात ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मात्र, 100 टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये लातूर पॅटर्न हीट झाला आहे. लातूरमधील तब्बल 151 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत.
राज्याचा विभागवार निकाल पाहता, त्यात लातूर शेवटून दुसऱ्या क्रमांकावर आहे. लातूर विभागाचा निकाल ९३.०९ टक्के इतका लागला आहे. मात्र १०० टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यादीत लातूर विभागानं पहिला क्रमांक पटकावला आहे. राज्यातल्या २४२ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत. यातले तब्बल १५१ विद्यार्थी एकट्या लातूरचे आहेत. म्हणजेच १०० टक्के गुण मिळवणारे राज्यातले ६० टक्क्यांहून अधिक विद्यार्थी लातूर विभागातले आहेत. त्यामुळे, पुन्हा एकदा लातूर पॅटर्न चर्चेचा विषय ठरला आहे.
लातूरची गुणवत्ता बावन्नकशी सोन्यासारखी आहे ! @bb_thorat@VarshaEGaikwadpic.twitter.com/fqY6g46hN7
— Dhiraj V Deshmukh (@MeDeshmukh) July 29, 2020
लातूरचे आमदार धीरज देशमुख यांनी दहावीच्या या 100 टक्के निकालानंतर माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, दहावीच्या परीक्षेतील लातूरचं यश हे बावन्नकशी सोनं असल्याचं विलाराव म्हणतात. त्यामध्ये आठवण सांगताना विलासराव म्हणतात की, राज्यात लातूर पॅटर्न गाजत असताना, मी राज्याचा शिक्षणमंत्री होतो. त्यावेळी, विलासराव शिक्षणमंत्रत्री असल्यानेच लातूरचे मुलं पहिली येतात, असे अग्रलेख लिहिले गेले. मात्र, मी शिक्षणमंत्री नसतानाही लातूरच्या विद्यार्थ्यांनी तेच यश मिळवलं. त्यावेळी मी बोलून दाखवलं की, लातूरचं यश हे बावन्नकशी सोनं आहे, ते आपोआप किंवा अपघातानं मिळालेलं नाही, त्याचं सातत्य आम्ही टिकवलंय, असे विलाराव म्हणाले होते. आमदार धीरज देशमुख यांनी आजा तो व्हिडिओ शेअर करत, विलासरावांच्या आठवणींना उजाळा दिला.
दरम्यान, लातूरनंतर १०० टक्के गुण मिळवणारे सर्वाधिक विद्यार्थी औरंगाबाद विभागात आहेत. औरंगाबाद विभागातल्या ३६ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले आहेत. त्यानंतर कोल्हापूर (१५), पुणे, अमरावती (प्रत्येकी १२), कोकण (११), नागपूर (३), मुंबई (२) या विभागांचा क्रमांक लागतो. तर नाशिक विभागातल्या एकाही विद्यार्थ्याला १०० टक्के गुण मिळवता आलेले नाहीत.