Join us

दगडाला यापुढे दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 6:18 AM

राज ठाकरे यांचा इशारा : सीएए आणि एनआरसीला दिला पाठिंबा

मुंबई : आज मोर्चाला मोर्चाने उत्तर दिले आहे. आणखी नाटके कराल तर यापुढे दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर दिले जाईल. इतर देशांंपेक्षा भारताने तुम्हाला इतके स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे एकोप्याने राहा, देशाशी वाकडे घेऊ नका, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी आझाद मैदान येथील भाषणात दिला.

पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात मनसेने काढलेल्या मोर्चाला चांगला प्रतिसाद मिळाला. गिरगाव चौपाटी येथील हिंदू जिमखाना ते आझाद मैदान दरम्यान निघालेल्या या मोर्चाची राज ठाकरे यांच्या भाषणाने सांगता झाली. आझाद मैदानातील आपल्या भाषणात राज यांनी देशभर सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) विरोधातील मोर्चांचा खरपूस समाचार घेतला. मुस्लिमांनी जे मोर्च काढले त्याचा अर्थच कधी लागला नाही. सीएए किंवा एनआरसीमुळे जे जन्मापासून येथे राहत आहेत त्यांना कोण बाहेर काढणार होते? कायद्यातच तशी तरतूद नाही तर मग तुम्ही कोणाला ताकद दाखवलीत, असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला. जगातील कोणत्याही देशात नसेल इतके स्वातंत्र्य आजघडीला भारतातील नागरिकांना मिळत आहे. मग तुम्ही तोच देश बरबाद करायच्या माग का लागला आहात? देशप्रेमी मुस्लिमांनी जागरूक राहून या गोष्टीचा विचार करायला पाहिजे, असे आवाहन राज यांनी केले.

पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना हाकलले पाहिजे. त्यात तडजोड होऊच शकत नाही, असे राज यांनी स्पष्ट केले. माझा देश म्हणजे धर्मशाळा आहे का? कुठूनही येतात आणि आपल्या देशात घुसखोरी करतात. बेरोजगारी आणि अन्य महत्त्वाचे मुद्दे आहेत. तसेच घुसखोरीचे संकटही मोठे आहे. एकट्या बांग्लादेशातून दोन कोटी लोक भारतात आल्याची आकडेवारी आहे. नेपाळमार्गे किती पाकिस्तानी आले त्याची कल्पनाच नाही, असे सांगत राज यांनी घुसखोरांना हुसकावून लावण्याची मागणी केली.

कायदे केलेत तर अंमलबजावणी करावीच लागेलआज देशात जी आर्थिक परिस्थिती निर्माण झाली आहे त्यावरून दुर्लक्ष करण्यासाठी कायदे आणत असाल तर ते चुकीचे आहे. पण जर खरेच कारवाई करायची असेल तर एकदाच काय ते दूध का दूध आणि पानी का पानी होऊ द्या. कायदे केलेत तर त्याची अंमलबजावणी करावीच लागेल, अशा शब्दांत राज यांनी केंद्र सरकारला प्रश्न केला.डाव्या-उजव्याच्या मध्ये... : एक तर तुम्ही डाव्या बाजूला राहा नाही तर उजव्या बाजूला राहा, अशी स्थिती झाली आहे. केंद्र सरकारवर टीका केली तर भाजपविरोधी आणि कौतुक केले तर भाजपसोबत असा दृष्टिकोन झाला आहे. डाव्या आणि उजव्याच्या मध्ये काही आहे की नाही, असा प्रश्न करत राज यांनी आपल्या भूमिकेचे समर्थन केले.

 

टॅग्स :राज ठाकरेमनसेहिंदुत्वनागरिकत्व सुधारणा विधेयकशिवसेना