Join us

गुलामीला उत्तर देण्याची सुरुवात शिक्षणातून होते

By admin | Published: June 29, 2017 3:08 AM

सर्व प्रकारच्या गुलामीला उत्तर देण्याची सुरुवात शिक्षणातून होते ही जाणीव बालिका ज्ञानदेव हिच्या कवितांतून व्यक्त झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सर्व प्रकारच्या गुलामीला उत्तर देण्याची सुरुवात शिक्षणातून होते ही जाणीव बालिका ज्ञानदेव हिच्या कवितांतून व्यक्त झाली आहे. वर्दीतल्या कविता वाचत असताना त्या व्यवस्थेची ही कवयित्री पाठराखण करीत नाही, तर विषमतावादी वास्तवाची चिरफाड करते हे जाणवते. सगळी किंमत चुकवून भीषण वास्वत निर्भयपणे समोर ठेवले आहे, त्या दृष्टीने ही कविता वेगळी ठरते, असे प्रतिपादन साहित्यिका प्रज्ञा पवार यांनी केले.सुभाष भेण्डे नवोदित लेखक वाड्मय पुरस्कार या पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षपदी त्या बोलत होत्या. मॅजेस्टीक आणि भेण्डे परिवार यांच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला. कवयित्री बालिका ज्ञानदेव यांना त्यांच्या ‘मॅगझिनीतून सुटतेय गोळी’ या काव्यसंग्रहाला देण्यात आला. ११ हजार १११ रुपये आणि मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. परीक्षक समितीतील संजय जोशी याप्रसंगी म्हणाले की, या कवितेत आक्रोश, आक्रंदन आहे. पण कांगावा नाही, अभिनिवेश नाही. स्वत:च स्वत:ला घडवत आणलेल्या या मुलीमध्ये आत्मविश्वास आहे. ज्या पर्यावरणात ही वावरते आहे. त्यातला आक्रस्ताळेपणा येथे नाही. अनेक प्रश्नांच्या जंजाळात ही कविता नेऊन टाकते, यातली भाषितं अस्वस्थ करणारी आहेत. पुरस्कारानंतर मनोगत व्यक्त करताना कवयित्री बालिका ज्ञानदेव यांनी कृतज्ञता व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, माझी आई नसती तर कदाचित मी कुठेतरी खुरप्याने खुरपत बसले असते आणि २-३मुलांना जन्म दिला असता. एका बाजूला पारंपरिक वातावरण आणि दुसऱ्या बाजूला परिवर्तन अशा पर्यावरणात मी जगते आहे. या कवितासंग्रहाला वेगळी पार्श्वभूमी आहे. या काव्यलेखनानंतर खात्यांतर्गत चौकशीला सामोरे जावे लागले. कवितेने मला जगायला शिकविले. हे पुस्तक आल्यानंतर काही काळ संर्घषाला सामोरे जावे लागेल मात्र त्याचीही तयारी आहे. या कवितेनेचे जगणे शिकविले आहे.