मुंबई : हिंदी साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सिद्धिदा मोरे यांना 'हिंदी अकादमी, मुंबई' तसेच 'कथा यूके'तर्फे आंतरराष्ट्रीय गौरव भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 'कथा यूके'चे संस्थापक महासचिव तेजेंद्र शर्मा आणि 'हिंदी अकादमी, मुंबई'चे डॉ. प्रमोद पांडे यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हिंदी अकादमीतर्फे सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन पुरस्करार्थींना सन्मानित करण्यात आले.
सिद्धिदा मोरे यांनी मागच्या २५ वर्षात 'सिद्धी आर्ट्स अनमोल यादे' या सांगितिक कार्यक्रमाचे ५०० हून अधिक शो केले आहेत. किशोर कुमार, महम्मद रफी, ओपी नय्यर, आर.डी बर्मन, लता मंगेशकर अशा अनेक दिग्गज कलाकारांवर त्या 'कॉन्स्पेट शो' करतात. यातून हिंदी साहित्य, कविता, गाणे, लिखाणाला प्रोत्साहन मिळत असते.
हिंदी साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या साहित्यिक, कवींना त्यांच्या योगदानाबद्दल मुंबई आणि यूकेतील हिंदी अकादमीतर्फे हा पुरस्कार देण्यात आला. यूके आणि भारतातील हिंदी अकादमीच्या संयुक्त विद्यमाने तसेच भारत सरकारच्या सहाय्याने ब्रिटनमध्ये या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
हिंदी साहित्याच्या माध्यमातून ब्रिटिश आणि भारत यांच्यातील अंतर कमी करण्याच्या उद्देशाने घेतलेला पहिला कार्यक्रम हाऊस ऑफ बुझहाई कॉमन्स, ब्रिटिश संसद, लंडन बर्न येथे संपन्न झाला. लंडनचे खासदार वीरेंद्र शर्मा हे या कार्यक्रमाच्या यजमानपदी होते.
या सोहळ्यामध्ये भारत, ब्रिटन आणि युरोपमधील नामवंत लेखक, पत्रकार, शिक्षक आणि हिंदी साहित्यात योगदान देणाऱ्या व्यक्तींना आमंत्रित आणि सन्मानित करण्यात आले होते. यावेळी भारतीय भारतीय उच्चायोगचे मंत्री समन्वय दीपक चौधरी, लंडनच्या काऊंसलर आणि प्रसिद्ध साहित्यकार जकिया झाकिया झुबेरी, पंजाबी लेखक आणि समुपदेशक के. सी.मोहन आणि प्रवासी साहित्यिक तेजेंद्र शर्मा विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
ज्येष्ठ साहित्यिक तेजेंद्र शर्मा यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले तर कल्पना यांनी आभार मानले. या कार्यक्रमात अरुणा अजितसारिया, ललित मोहन जोशी, अरुणा सभरवाल आणि हिंदी अधिकारी डॉ. नंदिता साहू यांच्यासह भारत आणि यूके आणि इतर देशांतील ८० मान्यवर उपस्थित होते.