औद्योगिकीकरणामुळे वाऱ्यांवर घोंगावतेय संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 05:32 AM2018-06-15T05:32:03+5:302018-06-15T05:32:03+5:30
वाढत्या औद्योगिकीकरणामुळे वाºयांच्या क्रमात बदल होत आहे. वारे वाहण्याचा क्रम हा अनिश्चित स्वरूपाचा असतो. परिणामी, सूर्याचा तप्त भाग पृथ्वीच्या दिशेला आल्यास पृथ्वीचे तापमान वाढते.
- सागर नेवरेकर
मुंबई : वाढत्या औद्योगिकीकरणामुळे वाºयांच्या क्रमात बदल होत आहे. वारे वाहण्याचा क्रम हा अनिश्चित स्वरूपाचा असतो. परिणामी, सूर्याचा तप्त भाग पृथ्वीच्या दिशेला आल्यास पृथ्वीचे तापमान वाढते. सूर्यावरील डाग पडलेला भाग पृथ्वीच्या दिशेला आल्यास तापमान कमी होते. तापमानवाढ झाली की वारे अति वेगाने वाहू लागतात. याचा फटका पर्यावरणासह मानवी जीवनाला बसत आहे. दुसरीकडे शहरीकरणामुळे जंगले नष्ट होत असून, वाढत्या तापमानामुळे महासागरातील उष्ण व थंड प्रवाह हे पूर्णपणे विस्कळीत झाले आहेत. याचा संबंध वारे निर्माण होण्याशी आहे. मानव आपली प्रगती करीत असताना निसर्गाचा विचार करीत नाही. याचा परिणाम जीवसृष्टीवरही होतो आहे, असे मत पर्यावरणतज्ज्ञांनी ‘जागतिक वारा दिना’च्या निमित्ताने ‘लोकमत’कडे मांडले.
पर्यावरणतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, वारे वाहत असताना त्यामध्ये बाष्प असले पाहिजे. मोसमी वारे हिंदी महासागरावरून भारतीय उपखंडात येतात. तेव्हा मोसमी वाºयांमध्ये प्रचंड प्रमाणात बाष्प असेल तर पाऊस पडतो. ज्या वेळी मान्सून परतीच्या मार्गावर लागतो. त्या वेळी भारतीय द्विपकल्पावरून हिंदी महासागराकडे मान्सून वाहत जातो. भारतीय द्विपकल्पावर जेव्हा मान्सून निर्माण होतो, त्या वेळी त्याकडे बाष्प नसते. परिणामी वारे कोरडे असतात. मान्सून पश्चिम बंगाल आणि ओरिसाच्या किनाºयावरून तामिळनाडूच्या किनाºयावर येतो तेव्हा बंगालच्या उपसागरातून मान्सून वाºयांना बाष्प मिळते. त्यामुळे तामिळनाडू आणि मद्रासच्या किनाºयावर पाऊस पडतो. याला ‘रिटर्निंग आॅफ मान्सून’ म्हणून संबोधले जाते. ग्रहीय वारे, ऋतुमानानुसार बदलणारे वारे, स्थानिक वारे हे जगातील वाºयांचे तीन प्रकार आहेत. तसेच मुंबईमध्ये दोन वारे वाहतात. त्यात मान्सून वारे आणि स्थानिक वारे होय. मान्सून वारे हे हंगामी स्वरूपात असतात आणि स्थानिक वाºयामध्ये मुंबईच्या समुद्रकिनाºयापासून ५० ते ६० किलोमीटरपर्यंत खारे आणि मतलबी वारे वाहत असतात, असे पर्यावरणतज्ज्ञांनी सांगितले.
असा होतो तापमानवाढीचा परिणाम
तापमानवाढीचे दोन परिणाम आहेत. पहिला परिणाम वाºयाजवळ बाष्पांचे प्रमाण वाढल्याने पावसाचे प्रमाण वाढते. दुसरा परिणाम तापमान वाढले तर हवेची आर्द्रता शोषून घेण्याची क्षमतासुद्धा वाढते. त्यामुळे नियमित पडणारा पाऊस हा अनियमित पडू लागतो.
जून, जुलै आणि आॅगस्टमध्ये पडणारा मान्सून आता अनिवांत झाला आहे. तसेच यावर दोन घटक परिणाम करतात. ‘अल निनो’ आणि ‘ला निनो’ हे आफ्रिकन कोस्टल रिझनवर वाहणारे सागरी प्रवाह वारे आहेत. अल निनो आणि ला निनो यांचे तापमान वाढले की हिंदी महासागराचे तापमान वाढते. हिंदी महासागराचे तापमान वाढले तर मान्सूनच्या वाºयांना जास्त प्रमाणात बाष्प प्राप्त होते.
मान्सूनला जास्त बाष्प प्राप्त झाल्यास १०० टक्क्यापेक्षा अधिक पाऊस पडतो. जर तापमान वाढले नाही, तर बाष्पाचे प्रमाण कमी होते. याला ‘ला निनो इफेक्ट’ असे म्हणतात, अशी माहिती पर्यावरण अभ्यासक के.पी. चौधरी यांनी दिली.