मुंबई : २०१९च्या निवडणुकीत मिळणारी केंद्रातील सत्ता म्हणजे हिंदू राष्ट्राची स्थापना नव्हे, हे २०१४ सालच्या निवडणुकीतील निकालानंतर दिसून आले आहे. विविध आश्वासनांचा सरकारला विसर पडल्याचा आरोप करत, हिंदुत्ववादी संघटनांनी भारतीय जनता पार्टीबाबतची नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे, तसेच आगामी लोकसभा निवडणुकीसाठीचे राजकारण हिंदू हितवर्धक असेल का? यावर चर्चा करण्यासाठी गोव्यातील फोंडा येथे असलेल्या श्री रामनाथ देवस्थानमध्ये ४ ते ७ जूनदरम्यान अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचे आयोजन केले आहे.मुंबई मराठी पत्रकार संघात शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ता सतीश कोचरेकर यांनी ही माहिती दिली. या वेळी लष्कर-ए-हिंद संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ईश्वरप्रसाद खंडेलवाल उपस्थित होते. कोचरेकर म्हणाले की, या अधिवेशनात भारतातील १९ राज्यांसह नेपाळ, श्रीलंका आणि बांगलादेश या देशांतील १८० हून अधिक हिंदू संघटनांचे ६५० पेक्षा अधिक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनात प्रामुख्याने हिंदूंचे संरक्षण, मंदिर रक्षण, संस्कृती रक्षण, इतिहास रक्षण, धर्मांतर, लव्ह जिहाद, काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन आदी मुद्द्यांवर कृती कार्यक्रम निश्चित केला जाईल. सोबतच पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंका येथील हिंदूंना साहाय्य करण्यासाठी कोणत्या माध्यमातून प्रयत्न करावेत, याचीही चर्चा होणार आहे.म्हणून हिंदू संघटना नाराज!गेली ४ वर्षे केंद्रात, तसेच देशातील बहुतांश राज्यांत हिंदुत्वनिष्ठ विचारांचा पक्ष असलेल्या भाजपाची सत्ता आहे. मात्र, काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन, समान नागरी कायदा, कलम ३७० रहित करणे, गोवंश हत्याबंदी, धर्मांतरबंदी, श्रीराम मंदिराचे पुनर्निर्माण आदी हिंदूंच्या मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्यांवर सरकारने कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. सरकार बदलल्यानंतरही विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चौक्सीसारखे आरोपी कोट्यवधी रुपयांचे घोटाळे करून विदेशात आरामात आहेत, यामुळे हिंदू संघटनांत नाराजी आहे.अधिवेशनात दिग्गजांची उपस्थिती!या अधिवेशनाला नेपाळचे माजी राजगुरू आणि तेथील राष्ट्रीय धर्मसभेचे अध्यक्ष माधव भट्टराय, संयुक्त राष्ट्र संघातील श्रीलंकेचे निवृत्त अधिकारी मरवनपुलावु सच्चिदानंदन, बांगलादेश मायनॉरिटी वॉचचे अध्यक्ष रवींद्र घोष आणि विविध राज्यांतील धर्मगुरू आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
‘हिंदुत्ववादीं’चा भाजपाविरोधी एल्गार! ४ जूनला गोव्यात अधिवेशन, आश्वासनांचा विसर पडल्याची नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2018 2:34 AM