आयआयटीत जातीय भेदभावरोधक पोस्टर्स; नियमांचे उल्लंघन केल्यास शिक्षेची तरतूद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 12:47 PM2023-08-03T12:47:07+5:302023-08-03T12:47:40+5:30

या अनुषंगाने संस्थेच्या पवई परिसरात अनेक ठिकाणी पोस्टर्स चिकटविण्यात आली आहेत.

Anti-caste posters at IITs Provision of punishment for violation of rules | आयआयटीत जातीय भेदभावरोधक पोस्टर्स; नियमांचे उल्लंघन केल्यास शिक्षेची तरतूद

आयआयटीत जातीय भेदभावरोधक पोस्टर्स; नियमांचे उल्लंघन केल्यास शिक्षेची तरतूद

googlenewsNext

मुंबई : विद्यार्थ्यांमध्ये जातीय भेदभाव रोखण्यासाठी आयआयटी, मुंबईने मार्गदर्शक तत्त्वे जारी करून मुंबई आयआयटीने या तत्त्वांचे उल्लंघन केल्यास कठोर शिक्षेचीही तरतूद असल्याचे जाहीर केले आहे. या अनुषंगाने संस्थेच्या पवई परिसरात अनेक ठिकाणी पोस्टर्स चिकटविण्यात आली आहेत.

विद्यार्थ्यांना लिंग, धर्म, जात, प्रदेश याऐवजी खेळ, संगीत आणि चित्रपटाच्या आवडीच्या आधारे सहकारी विद्यार्थ्यांशी मैत्री करावी, असे स्पष्ट करत अपमानास्पद, द्वेषपूर्ण किंवा जातीयवादी विनोदांवर बंदी घातली आहे. संस्थेने पवई परिसरात अनेक ठिकाणी लावलेल्या पोस्टर्समधील संदेशानुसार, विद्यार्थ्याला त्याच्या जेईई ॲडव्हान्स रँक किंवा गेट स्कोअरबद्दल किंवा त्याची जात उघड करणाऱ्या कोणत्याही गोष्टीबद्दल विचारणे अयोग्य आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. यावर्षी विविध सेलमधील पोस्टर, ओरिएंटेशनची सामग्री एका पोस्टरमध्ये संकलित करण्यात आली आहे. हे नवीन आणि विद्यमान दोन्ही विद्यार्थ्यांमध्ये प्रसारित केले जात आहे.

बीटेक केमिकल प्रथम वर्षाचा विद्यार्थी दर्शन सोळंकी याच्या मृत्यूनंतर संस्थेवर जातीय भेदभाव केल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर ही मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांचा विद्यार्थ्यांमध्ये प्रसार करण्याबरोबरच संस्थेच्या पवई कॅम्पसमध्ये ठिकठिकाणी पोस्टर चिकटवली आहेत.

...तर विद्यार्थ्यांना अस्वस्थ वाटू शकते
संस्थेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सहकारी विद्यार्थ्यांना त्यांची जन्मतारीख, प्रदेश, धर्म आणि जात याबद्दल विचारणे अयोग्य मानले गेले आहे. कारण यामुळे विद्यार्थ्यांना अस्वस्थ वाटू शकते. पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी आयोजित केलेल्या अभिमुखता सत्रात कोणत्याही प्रकारचा भेदभाव शून्य सहनशीलतेच्या धोरणावर भर दिला जात असल्याचे संस्थेने म्हटले आहे. संस्थेने सांगितले की, प्रत्येक वसतिगृह आणि विभागांमध्ये विविध सेलद्वारे पोस्टर्स लावली आहेत.
 

Web Title: Anti-caste posters at IITs Provision of punishment for violation of rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.