मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून अदानी समूहाविरोधात शनिवारी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले आहे. धारावीच्या मोर्चात संपूर्ण महाराष्ट्रातून लोक बोलावले असून धारावीमधील लोक कमी आहेत. ज्या लोकांना धारावीचा विकास नको आहे, त्या लोकांनी हा मोर्चा काढला आहे. त्यांना जनता जशास तसं उत्तर देईल, अशी अप्रत्यक्षरित्या टीका एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.
दरम्यान, धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात ठाकरे गटाने आज मोर्चा काढला. या मोर्चामध्ये शिवसैनिकांसह महाविकास आघाडी आणि इतर पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी मोर्चाला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकल्प नुसता चर्चेत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रश्नासाठी अनेकजण आवाज उठवत आहेत. यात शिवसैनिकांचाही समावेश आहे. मी त्यांना आश्वासन दिले होते की, धारावीसाठी गरज पडली तर मुंबईत काय अख्या महाराष्ट्र उतरवेन. आज मुंबईतील मोजके कार्यकर्तेच रस्त्यावर आले आहेत. ज्यांनी ज्यांनी अदानींची सुपारी घेतली आहे. त्यांनी हा अडकित्ता लक्षात घ्यावा, हा अडकित्ता आहे. खलबत्ता आहे. त्यात चेचून काढू. पुन्हा अदानीचं नाव काढणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सुनावले.
याचबरोबर, आता पन्नास खोके कमी पडायला लागले आहेत, त्यामुळे धारावी विकायला निघाले आहेत, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, आता हा लढा आता केवळ धारावीचा नाही तर महाराष्ट्राचा झाला आहे. अडीच वर्षे यशस्वीपणे चालणारे सरकार गद्दारी करून पाडले, हे आता सर्वांना समजलं असेल. त्यांना खोके कुणी पुरवले, त्यांची हॉटेल बुकिंग कुणी केली, हेही सर्वांना सजमलं असेल. जोपर्यंत मी होतो तोपर्यंत त्यांना काहीच करता आले नाही. त्यामुळे सरकार पाडले, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
ठाकरेंच्या ढोंगीपणाचा निषेध करण्याकरिता आलो आहे - चंद्रशेखर बावनकुळेदुसरीकडे, धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पाविरोधात काढलेल्या मोर्चावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंच्या ढोंगीपणाचा निषेध करत आहे, अशी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. ते म्हणाले, धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे काम उद्धव ठाकरेंच्या काळता करत आले असते. जेव्हा उद्धव ठाकरेंकडे अधिकार होते. पण त्यांच्या काळात निषक्रियेमुळे किंवा अनेक कारणे आहेत. उद्धव ठाकरे हे धारावी पुनर्विकास प्रकल्प करू शकले नाही आणि हा प्रकल्प आमच्या काळात होत आहे. धारावीकरांना घरे मिळणार आहे आणि त्याचे राहणीमान उंचवणार आहे, अशा वेळी उद्धव ठाकरे मोर्चा काढत आहेत. या प्रकल्पावरून उद्धव ठाकरेंनी ज्याबाबीला मांडल्यात त्यात काही तथ्य नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या ढोंगीपणाचा निषेध करण्याकरिता आलो आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.