लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: दादरच्या महात्मा गांधी जलतरण तलावात मगरीचे पिल्लू शिरल्याप्रकरणी चर्चेचा विषय झालेल्या खासगी प्राणिसंग्रहालयातील बेकायदा बांधकामांवर पालिकेने सोमवारी हातोडा उगारला. या कारवाईत पाच बांधकामे तोडण्यात आली. त्यात चार कच्च्या, तर एका पक्क्या बांधकामाचा समावेश होता. या बांधकामाबाबत पालिकेने संग्रहालय व्यवस्थापनाला एमआरटीपीअंतर्गत नोटीस बजावली होती.
मागील महिन्यात पालिकेच्या तरण तलावात मगरीचे पिल्लू आढळून आल्याने खळबळ उडाली होती. हे पिल्लू याच प्राणिसंग्रहालयातून आल्याचा दावा तरण तलावातील कर्मचाऱ्यांनी केल्याने वाद निर्माण झाला होता.
व्यवस्थापनाचे म्हणणे काय?
- त्यांचा दावा संग्रहालय व्यवस्थापनाने फेटाळून लावला होता. त्यामुळे मगरीचे पिल्लू आले कुठून, असा प्रश्न निर्माण झाला होता.
- सीसीटीव्ही फुटेजमधूनही पिल्लू प्राणिसंग्रहालयातून बाहेर पडल्याचे दिसत नव्हते. त्यामुळे पिल्लू आले कुठून, हा प्रश्न कायम आहे.
- दरम्यान, या संग्रहालयाच्या परिसरात काही बेकायदा बांधकामे केल्याप्रकरणी पालिकेने संग्रहालयाला नोटीस पाठवली होती. त्यानुसार पालिकेच्या जी-उत्तर विभागाने बांधकामावर कारवाई केली.