आता दातखिळी बसली का?, गोपीचंद पडळकरांना भाईंचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 07:52 AM2021-05-18T07:52:38+5:302021-05-18T07:54:59+5:30
देशात कोरोना महामारीचं विदारक रुप पाहायला मिळत आहे, गेल्या दोन दिवसांत कोरोनाबाधितांचा वाढीव आकडा कमी होत असला तरी अद्यापही कोरोनाचे संकट आहेच
मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय लोकसेवा आयोगाने २७ जून रोजी होणारी नागरी सेवा प्राथमिक परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घोषित केला आहे. गुरुवारी याबाबत परिपत्रक काढण्यात आलं. आता ही परीक्षा १० ऑक्टोबर रोजी होणार असल्याचं यूपीएससीकडून सांगण्यात आलं आहे. यावरुन काँग्रेस नेते भाई जगताप यांनी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांना लक्ष्य केलंय. एमपीएससी परीक्षा रद्द झाल्यानंतर गोंधळ घालणारे आता कुठे आहेत? असा सवाल भाईंनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन विचारला आहे.
देशात कोरोना महामारीचं विदारक रुप पाहायला मिळत आहे, गेल्या दोन दिवसांत कोरोनाबाधितांचा वाढीव आकडा कमी होत असला तरी अद्यापही कोरोनाचे संकट आहेच. त्यामुळे, बहुतांश राज्य सरकारने 31 मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे, सर्वसामान्यांचे हाल होत असून केवळ अत्यावश्य सेवांनाच परवानगी देण्यात आली आहे. सरकार दरबारीही 15 टक्केच कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. तसेच, शाळांच्या परीक्षाही रद्द झाल्या आहेत. आता, केंद्रीय लोकसेवा आयोगाने युपीएससीची परीक्षाही रद्द केली आहे. त्यावरुन, काँग्रेस नेते आमदार भाई जगताप यांनी गोपीचंद पडळकर यांना लक्ष्य केलंय.
राज्य सरकारने MPSC ची परीक्षा रद्द केली म्हणून रस्त्यावर लोळण घेऊन आंदोलन करणारे, केंद्र सरकारने UPSC ची परीक्षा रद्द केल्यावर आता हे महाराष्ट्र द्रोही कोणत्या बिळात जाऊन लपले आहेत, असा सवाल भाईंनी विचारला आहे. तसेच, आता दातखिळी बसली आहे का? असे म्हणत गोपीचंद पडळकर यांचे नाव न घेता महाराष्ट्रद्रोही असेही म्हटलंय.
गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारने एमपीएससीची परीक्षा रद्द केल्यानंतर पुण्यातील रस्त्यावर झोपून आंदोलन केले होते. त्यामुळे, विद्यार्थ्यांनीही या आंदोलनात मोठा सहभाग घेतला. त्यानंतर, एमपीएससीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. आता, युपीएससीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे.
७१२ पदांची परीक्षा रद्द
राष्ट्रीय लोकसेवा आयोगाकडून २७ जून रोजी IAS, IPS आणि IFS अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी प्राथमिक(Preliminary) परीक्षा आयोजित केली होती. UPSC कडून भारतीय प्रशासकीय सेवा(IAS), भारतीय पोलीस सेवा(IPS) आणि भारतीय विदेश सेवा(IFS) मध्ये अधिकारी निवड करण्यासाठी इच्छुक उमेदवारांची परीक्षा घेण्यात येते. ग्रुप ए आणि ग्रुप बी असे एकून ७१२ पदं नागरी सेवा अंतर्गत परीक्षा घेऊन भरली जाणार होती. यासाठी २७ जून २०२१ रोजी प्राथमिक परीक्षा होती. ४ मार्च २०२१ रोजी या परीक्षेसाठी फॉर्म जारी केले होते. प्राथमिक परीक्षेत पास होणाऱ्या ज्या उमेदवारांना निवडलं जातं त्यांनाच मुख्य परीक्षेला बसला येते.
राज्य सरकारने MPSC ची परीक्षा रद्द केली म्हणून रस्त्यावर लोळण घेऊन आंदोलन करणारे...
— Bhai Jagtap - भाई जगताप (@BhaiJagtap1) May 17, 2021
केंद्र सरकारने UPSC ची परीक्षा रद्द केल्यावर आता हे महाराष्ट्र द्रोही कोणत्या बिळात जाऊन लपले आहेत??
आता दातखिळी बसली आहे का??#महाराष्ट्रद्रोही