‘अँटी स्मॉग गन्स’ आता उडविणार प्रदूषणाचा धुव्वा...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 10:31 AM2023-10-19T10:31:21+5:302023-10-19T10:31:29+5:30
वाहनांवरील स्प्रिंकलर स्प्रेमधून पाण्याचा मारा, ३० युनिटसाठी निविदा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई शहरातील धूलिकणांचे अतिधोकादायक प्रमाण, त्यामुळे नागरिकांवर होणारे दुष्परिणाम, वाढते प्रदूषण यावर तातडीचा उपाय म्हणून आता पालिकेकडून वाहनांवर बसविण्यात येणाऱ्या अँटी स्मॉग गन्सची निविदा मागविण्यात आली आहे. अँटी स्मॉग गन्समधून हवेमध्ये पाण्याचे थेंब शिंपडले जातात, ज्यामुळे हवेतील धूर, धूलिकण आणि प्रदूषण पसरविणारे वायू जमिनीवर बसण्यास मदत होते. यामुळे हवेतील
प्रदूषणाला आळा बसण्यास मदत होत असल्याची माहिती पर्यावरण विभागाकडून देण्यात आली आहे.
वातावरणातील धूलिकण, धूळ नियंत्रणासाठी तत्काळ करण्यात येणाऱ्या योजनांवर पालिकेचा पर्यावरण विभाग सध्या काम करत आहे. यासाठी आठवड्याभरात पालिका प्रशासन मार्गदर्शक सूचनांसह नवीन नियमावली जाहीर करणार आहे. हिवाळ्यात वाढणारे धूळ व धूलिकण प्रदूषण नियंत्रणात आणणे हा याचा मुख्य उद्देश असणार आहे. दरम्यान, या उपाययोजनांपैकीच स्मॉग गन्स हा एक पर्याय असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. पालिकेकडून जवळपास ३० स्मॉग गन्ससाठी निविदा जाहीर करण्यात आली आहे.
पालकमंत्र्यांकडून आढावा
मुंबईतील पूल, रस्त्यांची विकासकामे, इमारतींची बांधकामे यामुळे धूलिकण, धूर यांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. त्यामुळे प्रदूषण वाढत असल्याने तातडीच्या उपाययोजनांसाठी शहर पालकमंत्री संबंधित विभागासोबत आढावा बैठक घेणार आहेत.
हवेची गुणवत्ता कुठे किती?
विलेपार्ले ३१८
माझगाव २८४
चकाला २७७
मुलुंड २१७
मालाड २०९
वरळी २०५
चेंबूर २०१