प्रदूषण, धूलिकण रोखणार अँटी स्मॉग मशीन्स; मुंबईत ४ ठिकाणी फवारणी सुरू, डिसेंबरअखेर २५ मशिन्स कार्यरत होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 09:49 AM2023-12-14T09:49:10+5:302023-12-14T09:49:37+5:30
प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आणि हवेतील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी मुंबई पालिकेच्यावतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत.
मुंबई : मुंबईतीलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी आणि हवेतील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी मुंबई पालिकेच्यावतीने क्लाउड सिडींग, डीप क्लिनिंग मोहीम, रस्ते धुलाई अशा विविध उपाययोजना केल्या जात आहेत. दरम्यान तातडीचा उपाय म्हणून अँटी स्मॉग गन (धुरके शोषक यंत्राचा) हा त्यातीलच आणखी एक पर्याय पालिकेने निवडला आहे.
मुंबई महानगरपालिकेच्यावतीने २५ वॉर्डांमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे भाडेतत्त्वावरील अँटी स्मॉग मशीन्सची खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामधील ४ अँटी स्मॉग मशीन्स पालिकेच्या ताफ्यात आली आहेत. येत्या डिसेंबरअखेर ही सर्व यंत्रे पालिकेच्या सर्व वॉर्डात कार्यरत करण्यात येतील, अशी माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे.
मुंबईतील हवेतील धुळीचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी महापालिकेच्यावतीने मार्गदर्शक धोरण जाहीर करतानाच पालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी धूळ प्रतिबंधक यंत्रे कार्यान्वित करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले होते. तसेच प्रत्येक बांधकामाच्या ठिकाणी पुढील १५ दिवसांत धूळ प्रतिबंधक यंत्र (अँटी स्मॉग मशीन) बसवण्याच्याही सूचना केल्या होत्या. त्यानुसार मुंबई महापालिकेने ३० धूळ प्रतिबंधक यंत्र खरेदीचा निर्णय घेत यासाठीची निविदा प्रक्रिया राबवली. ही निविदा अंतिम टप्प्यात आली आहे. अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी यासाठी अपेक्षित असल्याने तोपर्यंत धुळीचे प्रदूषण नियंत्रणात राखण्यासाठी महापालिका आयुक्त यांनी तात्काळ भाडेतत्त्वावर याप्रकारची यंत्रे घेण्याचे निर्देश दिले आहेत.
शहरात मोठ्या प्रमाणात विकास कामे करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी त्यामुळे धुलिकरण हवेत पसरत आहेत. वायू प्रदूषणात त्यामुळे अधिक भर पडत आहे. प्रदूषण कमी होण्यासाठी महापालिकेने रस्ते धुण्यावर प्राधान्य दिले. तसेच मुख्यमंत्रीही स्वच्छतेचा आढावा घेत आहे. आता प्रदूषण कमी करण्यासाठी पालिकेने प्राधान्य दिले असून त्यासाठीच नवीन यंत्रे घेत आहे.
प्रत्येक वॉर्डात एक याप्रमाणे अँटी स्मॉग मशीनचे नियोजन असून आतापर्यंत ४ यंत्रे पालिकेच्या ताफ्यात दाखल झाली आहेत. सध्या ही ४ यंत्रे शहर भागात एक, पूर्व उपनगरात १ आणि पश्चिम उपनगरात २ या प्रमाणे कार्यरत आहेत. पश्चिम उपनगरांत वांद्रे कलानगरपासून पश्चिम द्रुतगती महामार्गावरून दहीसरपर्यंत आणि पुढे दहीसर ते वांद्रे या एस. व्ही. रोडवरून या यंत्राचा वापर केला जात आहे. तर पूर्व द्रुतगती महामार्ग शीव ते मुलुंड आणि एलबीएस रोड असा धुळीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आणखी ४ तर डिसेंबरअखेर सर्व यंत्रे पालिकेकडे दाखल होतील.
जमशेदपूरहून यंत्रांची आयात :
या अँटी स्मॉग मशिन्स वेगवेगळ्या सुट्या भागांच्या साहाय्याने तयार कराव्या लागत आहेत. स्मॉग मशिन्स या वाहनांवर बसविण्यात येऊन मग त्यांची फवारणी केली जात आहे. या प्रकारच्या मशिन्स पालिकेकडे जमशेदपूरहून येणार आहेत.
मुंबई पालिकेच्यावतीने २५ वॉर्डांमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे भाडेतत्त्वावरील अँटी स्मॉग मशिन्सची खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
काय करते अँटी स्मॉग मशिन?
अँटी स्मॉग गनला स्प्रे गन, मिस्ट गन किंवा वॉटर कॅनन असेही म्हणतात. अँटी स्मॉग गन धूळ आणि इतर प्रदूषकांचे कण पाण्यासह जमिनीवर आणते. त्यामुळे वायू प्रदूषणाची पातळी कमी होते.
अवजड वाहनांच्या मागील बाजूस अँटी स्मॉग गन बसवून ती पाण्याच्या टाकीला जोडलेली असते. मोठ्या शहरांमधील वाढते हवा प्रदूषण कमी करण्याबरोबरच इतर काही कारणांसाठीही अँटी स्मॉग गन वापरल्या जातात.
खाणीत ग्राइंडिंग, कोळसा आणि दगड फोडताना निर्माण होणाऱ्या धुळीवर नियंत्रण ठेवण्यासाठीही त्याचा वापर केला जातो.