मुंबई : सुमारे वीस वर्षांहून अधिक काळ केईएम रुग्णालयात तंबाखूविरोधी क्लिनिकद्वारे व्यसनाधीन रुग्णांवर उपचार आणि समुपदेशन केले जात आहे. हे क्लिनिक आता अद्ययावत करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने बजाज इलेक्ट्रिकल फाउंडेशनसोबत सामंजस्य करार केला आहे.
तंबाखू सेवन करण्याची सवय अनेक रोगांना आमंत्रण देते. किशोरवयीन आणि तरुण पिढीमध्ये देखील हे व्यसन आढळून येते. एका सर्वेक्षणानुसार २०१६-१७ मध्ये भारतात १५ वर्षे ते त्याहून अधिक वयाच्या एकूण २८ कोटी ७ लाख लोकांना तंबाखूचे व्यसन आहे. ५ पैकी १ प्रौढ (म्हणजे अंदाजे २० कोटी) व्यक्ती धूररहित तंबाखूचे सेवन करतात, तर १० पैकी १ प्रौढ (१० कोटींहून अधिक) तंबाखूचे सेवन करतात. रुग्णालयातील मानसोपचार विभागामध्ये सन १९९१ पासून ‘ड्रग डेडिक्शन सेंटर ऑफ एक्सलन्स’ हा विभाग सुरू आहे. तंबाखू अधीन झालेल्या रुग्णांना तंबाखू सोडण्यास मदत करण्यासाठी निकोटिन रिप्लेसमेंट, फार्माकोथेरपी (व्हॅरेनिकलीन/बुप्रोपियन), समुपदेशन आणि वर्तन सुधारणा सेवा आदी उपक्रम या माध्यमातून राबवले जातात.
दर्जेदार सेवेसह उपचारांसाठी हातभार-
१) रुग्णालयाच्या या उपक्रमाला हातभार लावण्यासाठी बजाज इलेक्ट्रिकल फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे.
२) कंपनीच्या सीएसआर फंडातून रुग्णालयातील तंबाखूविरोधी क्लिनिक अधिक अद्ययावत केले जाणार आहे.
३) रुग्णांच्या नोंदी, विनामूल्य औषधोपचार आणि समुदाय जागरुकता कार्यक्रमांसाठी मदत होणार आहे.
४) रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत आणि बजाज फाऊंडेशनच्या विशेष कार्यकारी अधिकारी मधुरा तळेगावकर यांनी या संयुक्त उपक्रमासाठी एक वर्षाच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
५) ‘तंबाखू बंद क्लिनिक’द्वारे रुग्णांना अधिक अद्ययावत आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा पुरवणे शक्य होणार आहे.