मुंबईकरांच्या शरीरात तयार होतात संसर्गाविरोधातील प्रतिपिंड; खासगी प्रयोगशाळांतील सर्वेक्षण अहवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 01:16 AM2020-07-24T01:16:53+5:302020-07-24T06:21:44+5:30
दोन खासगी प्रयोगशाळांनी ९ हजार ५९० लोकांची तपासणी केली आहे.
मुंबई : शहर, उपनगरात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दोन खासगी प्रयोगशाळांनी केलेल्या सर्वेक्षणात मुंबईकराच्या शरीरात अँटीबॉडी (प्रतिपिंड) तयार झाल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्वेक्षणानुसार, २४ टक्के लोकांच्या शरीरात कोरोनाविरोधातील अँटीबॉडी तयार झाल्याचे दिसून आले. म्हणजेच, मुंबईतील एक चतुर्थांश लोकांचा कोरोना (कोविड)सह सामना झाला असून त्याविरोधात शरीरात प्रतिपिंडाची निर्मिती झाली आहे.
दोन खासगी प्रयोगशाळांनी ९ हजार ५९० लोकांची तपासणी केली आहे. त्यात एका प्रयोगशाळेने ५ हजार ८४५ तर दुसऱ्या प्रयोगशाळेने ४ हजार १०५ नमुने तपासले आहेत. नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल आणि एका प्रयोगशाळेने केलेल्या एकत्रित सेरो सर्वेक्षणात २५.१०% लोक पॉझिटिव्ह आले. एनसीडीसीने दिल्लीच्या अकरा जिल्ह्यांतील २१,३८७ लोकांवर आयजीजी अँटीबॉडी चाचणी केली. त्यात ५,०२२ पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे कोरोना विषाणूच्या संपर्कातील अनेक लोकांत लक्षणे नव्हती, त्यांच्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाल्याचे मत सूक्ष्मजीवशास्त्र प्रमुख डॉ. रमाकांत सौनिक यांनी मांडले.
आरटी-पीसीआर चाचणीद्वारे मुंबईत पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्याचा दर २३.३% तर अँटीबॉडी चाचणीद्वारे पॉझिटिव्ह येणाऱ्यांचा दर २४.३%आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार, या विषाणूच्या संपर्कात मोठ्या संख्येने लोक आले आहेत, त्यातून लक्षणविरहित बरेही झाले.
अहवाल पालिकेत सादर
पालिकेच्या आरोग्य विभागाच्या डॉ. दक्षा शहा यांनी सांगितले, या प्रयोगशाळांनी केलेला अहवाल पालिकेत सादर केला आहे. मात्र या सर्वेक्षणातील निरीक्षणाबाबत ठोस मत व्यक्त करणे कठीण आहे. त्यामुळे पालिकेने केलेल्या सेरो सर्वेक्षणाच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.