लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नोव्हेल कोरोना व्हायरसविषयी आपल्याला अजूनही बऱ्याच गोष्टी संशोधनातून माहिती होत असून कोविड-१९ मधून बऱ्या झालेल्या व्यक्तींना या विषाणूचा पुन्हा संसर्ग होण्याची मोठी शंका सर्वांच्या मनात आहे. संसर्ग होऊन गेलेल्या व्यक्तीच्या शरीरात तयार झालेली प्रतिपिंडे म्हणजे अँटिबॉडीज त्या व्यक्तीला संरक्षण पुरवू शकतात का आणि पुरवत असतील तर त्या किती काळापर्यंत प्रभावी राहतात, अशा अँटिबॉडीज पुनःसंसर्गच्या सामना करण्याइतक्या शक्तिशाली असतात का, या विषयावर अजूनही खूप संशोधन होण्याची गरज असल्याचे मत संसर्गजन्य आजार विशेषज्ज्ञ डॉ. अनिता मॅथ्यू यांनी व्यक्त केले. डॉ. मॅथ्यू म्हणाल्या की, जागतिक आरोग्य संस्थेने (डब्ल्यूएचओ) सांगितल्याप्रमाणे अँटिबॉडीज हा काही आपला इम्युनिटी पासपोर्ट नाही.
अँटिबॉडीजचे आयुर्मान आणि त्याची ताकद यांचा सखोल अभ्यास होण्याची गरज जगभरातील संशोधक सातत्याने मांडत आहेत. त्यासाठी नजीकच्या काळात कोविड-१९ होऊन गेलेल्या व्यक्तींच्या अधिक विस्तृत गटांचे व्यापक निरीक्षण करावे लागेल. आपल्याकडे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) कडून कोविड-१९ वर उपचार घेतलेल्या व्यक्तींमधील पुनःसंसर्गच्या प्रकरणांचा अभ्यास केला जात आहे. आकडेवारीवर आधारित अधिकाधिक तथ्ये अजून आपल्या हाताशी लागायची आहेत, पण दरम्यानच्या काळात अँटिबॉडीजना गृहीत धरून चालणार नाही, असे त्यांनी सांगितले.
..........................