Join us

सेव्हन हिल्स रुग्णालयात लस घेतल्यानंतरच्या अँटीबॉडीजचा होणार अभ्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2021 4:06 AM

लसीबाबतचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्नस्नेहा मोरेलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाच्या तीव्र संक्रमणानंतर आता पुन्हा कोरोनाची दुसरी ...

लसीबाबतचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न

स्नेहा मोरे

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाच्या तीव्र संक्रमणानंतर आता पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली आहे. या लाटेला प्रतिबंध करण्यासाठी कोरोना लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मात्र अजूनही सामान्यांच्या मनात लसीबद्दल गैरसमज, चुकीच्या समजुती आहेत. त्या दूर करण्यासाठी आता पालिकेच्या सेव्हन हिल्स रुग्णालयाने लसीकरणानंतर शरीरात निर्माण होणाऱ्या अँटीबॉडीजचा (प्रतिपिंड) अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे.

पालिकेच्या सेव्हन हिल्स रुग्णालयाने कोरोनाच्या काळात मोठे योगदान दिले आहे. मागील वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून सेव्हन हिल्सने उपचार करून मोठ्या संख्येने रुग्णांना कोरोनामुक्त केले. आता कोरोना लसीकरण मोहीम सुरू झाल्याने या रुग्णालय प्रशासनाने नव्या स्वरूपाचा अभ्यास करण्याचे ठरवले आहे. या संशोधनात्मक अभ्यासात रुग्णालयातील आराेग्य कर्मचाऱ्यांच्या शरीरात लस घेतल्यानंतर प्रतिपिंड निर्माण होतात का? रोगप्रतिकारकशक्ती वाढते का? शरीरात प्रतिपिंड किती काळ टिकतात? प्रतिपिंड निर्माण होण्यासाठी किती कालावधी लागतो? किती प्रतिपिंड निर्माण होतात? अशा विविध अंगांनी अभ्यास करण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. बाळकृष्ण अडसूळ यांनी दिली.

डॉ. अडसूळ यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, या संशोधनात्मक अभ्यासासाठी रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या शरीरातील अँटीबॉडीजचा अभ्यास करण्यात येणार आहे. हा अभ्यास जागतिक आरोग्य संघटनेच्या संशोधनाचा भाग आहे. त्यामुळे या अभ्यासाअंती कोव्हॅक्सिन असो वा कोविशिल्ड दोन्ही लसींची अचूक परिणामकारकता पडताळण्यास मदत होईल.

* ...तेव्हाच सामूहिक प्रतिकारकशक्ती तयार होईल!

लसीकरणाकडे प्रत्येकाने सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. संसर्गाची शक्यता लसीकरणामुळे अतिशय कमी होते, तसेच सहआजार असलेल्या रुग्णांनाही लसीकरणामुळे संरक्षण मिळते. वैयक्तिक आणि सामूहिक पातळीवरचे फायदे लसीकरणामुळे साध्य होणार आहेत. लस घेतल्यानंतरही संसर्ग झाला, तर तो तीव्र स्वरूपाचा असणार नाही. लसीकरणातील दोन्ही डोस घेतल्यानंतर प्रतिकारशक्ती वाढायला मदत होईल, विषाणूमुळे होणाऱ्या आजाराचा फैलाव कमी होईल. त्याला पुढे जाण्यासाठी वाट मिळणार नाही. संसर्गाची जी साखळी आहे ती तोडण्यासाठीही मदत होईल. त्यामुळे अधिकाधिक लोक लसीकरण करतील, तेव्हा सामूहिक प्रतिकारकशक्ती तयार होईल, असे डॉ. अडसूळ यांनी सांगितले.

............................