अँटिग्वाच्या डॉक्टरने उपचारास नकार दिल्याने वैद्यकीय अहवाल उच्च न्यायालयात सादर करू शकत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 07:00 AM2019-08-27T07:00:20+5:302019-08-27T07:00:41+5:30

पीएनबी बँक घोटाळा : मेहुल चोक्सीच्या वकिलाने दिली माहिती

The Antigua doctor may not submit a medical report to the High Court for refusing treatment | अँटिग्वाच्या डॉक्टरने उपचारास नकार दिल्याने वैद्यकीय अहवाल उच्च न्यायालयात सादर करू शकत नाही

अँटिग्वाच्या डॉक्टरने उपचारास नकार दिल्याने वैद्यकीय अहवाल उच्च न्यायालयात सादर करू शकत नाही

Next

मुंबई : पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील महत्त्वाचा आरोपी मेहुल चोक्सी याने सोमवारच्या सुनावणीत वैद्यकीय अहवाल सादर करण्यास नकार दिला. अँटिग्वाच्या डॉक्टरने आपल्यावर उपचार करण्यास नकार दिल्याने आपण वैद्यकीय अहवाल सादर करू शकत नाही, अशी माहिती मेहुल चोक्सीच्या वकिलांनी उच्च न्यायालयाला दिली.


मेहुल चोक्सीला ‘फरारी आर्थिक गुन्हेगार’ जाहीर करण्यासाठी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) विशेष न्यायालयात अर्ज केला आहे. ईडीच्या या कारवाईविरोधात चोक्सीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
या याचिकेवरील सुनावणीत जून महिन्यात उच्च न्यायालयाने चोक्सीला त्याचे वैद्यकीय अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. हे अहवाल जे.जे. रुग्णालयाच्या डॉक्टरांना दाखवून चोक्सी खरोखरच त्याच्या प्रकृतीमुळे भारतात परत येऊ शकतो की नाही, याची छाननी न्यायालय करणार होते. तसेच त्याला एअर अ‍ॅम्ब्युलन्समधून भारतात आणणे शक्य आहे का? याबाबत जे. जे. रुग्णालयाच्या डॉक्टरांना मत देण्यास सांगितले होते.
सोमवारी या याचिकेवरील सुनावणीत चोक्सीचे वकील विजय अगरवाल यांनी न्यायालयाला सांगितले की, ते चोक्सीचा वैद्यकीय अहवाल सादर करू शकत नाहीत.
‘मेहुल चोक्सीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरने काही कारणास्तव त्याच्यावर उपचार करण्यास नकार दिला आहे. त्याचे कारण सीलबंद अहवालात सादर करत आहे,’ असे विजय अगरवाल यांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर ईडीचे वकील हितेन वेणेगावकर यांनी चोक्सीचा अर्ज फेटाळण्याची विनंती न्यायालयाला केली. ‘चोक्सीला ‘फरारी आर्थिक गुन्हेगार’ जाहीर करण्याची प्रक्रिया या याचिकेमुळे प्रलंबित आहे. त्यामुळे ही याचिका फेटाळावी,’ अशी विनंती वेणेगावकर यांनी केली.


‘प्रकृती अस्वस्थ्यामुळे आपण भारतात चौकशीसाठी तपासयंत्रणांपुढे हजर राहू शकत नाही, असे चोक्सीचे म्हणणे आहे. मात्र, तुमच्या या दाव्याचे समर्थन करणारी कागदपत्रे तुमच्याकडे नाहीत, तर तुम्ही ही याचिका मागे घ्या,’ असे न्यायालयाने म्हटले. त्यानंतर अगरवाल यांनी ही याचिका मागे घेतली. अटक टाळण्यासाठी आणि तपासयंत्रणेचा ससेमिरा चुकविण्यासाठी चोक्सी देश सोडून फरार झाला. त्यामुळे त्याला देशात परत आणण्यासाठी ईडीने त्याला ‘फरार आर्थिक गुन्हेगार’ घोषित करण्याकरिता विशेष पीएमएलए न्यायालयात अर्ज केला आहे. चोक्सीला फरार घोषित केल्यानंतर ईडी त्याच्या सर्व संपत्तीवर टाच आणू शकते.

Web Title: The Antigua doctor may not submit a medical report to the High Court for refusing treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.