Join us

२६ हजार ९५१ कुत्र्यांचे अँटिरेबीज लसीकरण; डब्ल्यूव्हीएस-एमआर संस्थेची मदत 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2024 10:11 AM

भटक्या कुत्र्यांच्या चाव्यामुळे होणाऱ्या रेबीज या प्राणघातक रोगापासून बचावासाठी पालिकेकडून पल्स अँटिरेबीज लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.

मुंबई : भटक्या कुत्र्यांच्या चाव्यामुळे होणाऱ्या रेबीज या प्राणघातक रोगापासून बचावासाठी पालिकेकडून पल्स अँटिरेबीज लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये ५ दिवसांत २६ हजार ९५१ कुत्र्यांचे लसीकरण करण्यात आले. वर्ल्डवाईड व्हेटरनरी सर्व्हिसेस-मिशन रेबीज (डब्ल्यूव्हीएस-एमआर) या संस्थेची मदत पालिकेकडून घेण्यात आली.

प्राणी कल्याण करणे व त्यासोबतच प्राण्यांपासून मानवामध्ये होणारे संक्रमण टाळण्यासाठी पालिकेकडून विविध कार्यक्रम राबविले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाणे, नवी मुंबई आणि पनवेलच्या हद्दीला लागून असलेल्या १० प्रशासकीय विभागांतील भटक्या कुत्र्यांचे लसीकरण करण्यासाठी २६ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान अँटिरेबीज लसीकरण मोहीम राबविण्यात आल्याचे पशुवैद्यकीय विभाग आणि देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. कलिमपाशा पठाण यांनी सांगितले. श्वान पकडणारे प्रशिक्षित स्वयंसेवक, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांचे सदस्य आदींनी अहोरात्र मेहनत घेत सूक्ष्म व्यवस्थापन आणि उत्तम अंमलबजावणीच्या बळावर ही मोहीम पार पडल्याची माहिती त्यांनी दिली.

रेबीजमुक्त मुंबईसाठी प्रयत्न :

१) चेंबूर येथे या मोहिमेचा समारोप कार्यक्रम नुकताच पार पडला. ही मोहीम यशस्वी करणाऱ्या प्रत्येक घटकाबद्दल यावेळी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. सहभागी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर प्रमाणपत्रेही प्रदान करण्यात आली.

२) ‘सामूहिक प्रयत्नातून सार्वजनिक आरोग्य आणि प्राणी कल्याणाप्रति केलेले हे अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य आहे आणि रेबीजमुक्त मुंबईसाठीच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. 

३) या मोहिमेला मिळालेल्या यशाबद्दल अभिमान वाटतो, अशी भावना मिशन रेबीज मुंबईचे प्रकल्प प्रमुख डॉ. अश्विन सुशीलन यांनी यावेळी व्यक्त केली.

टॅग्स :मुंबईनगर पालिका