मुंबईत रविवारी रंगणार अनुभूती काव्य संमेलन; ‘पासबान ए अदब‘चे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 10:50 PM2019-10-31T22:50:11+5:302019-10-31T22:50:26+5:30
दिग्गज कवींचा सहभाग
मुंबई : देशी भाषेच्या संवर्धनासाठी राष्ट्रीयस्तरावर कार्यरत असलेल्या ‘पासबान-ए-अदब’ या संस्थेच्या येत्या रविवारी (दि.३) राष्ट्रीयस्तरावर अनुभूती हिंदी काव्य संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे. सौमय्या कॉलेजच्या सभागृहात दिवसभर विविध सत्रामध्ये चालणाऱ्या सोहळ्यात प्रसिद्ध कवी प्रा. अशोक चक्रधर, डॉ. उदय प्रताप सिंह, डॉ. सचिदानंद जोशी, कैसर खलिद, रमेश शर्मा, संदीप नाथ, माया गोविंद आदी दिग्गज सहभागी होणार आहेत.
पासबान-ए-अदबचे अध्यक्ष व विशेष पोलीस महानिरीक्षक (पीसीआर) कैसर खलिद आणि सचिव दानिश शेख यांनी यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, भारतीय भाषा, साहित्याला चालना मिळावी, त्याच्या माध्यमातून देशात सौहार्द व एकात्मतेची भावना दृढ करण्याच्या हेतूने गेल्या दहा वर्षापासून ही संस्था कार्यरत आहे. त्यांतर्गत उर्दू, हिंदी व मराठी भाषेत मुंबईसह राज्यभरात संमेलन आयोजिले जातात. त्यामध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर लेखक, कवी यांना निमंत्रित करण्यात येते. त्याचबरोबर होतकरू लेखक, कवींनाही संधी दिली जाते. यावर्षीचा ‘अनुभूती’ कविसंमेलन ३ नोव्हेंबरला सोमय्या कॉलेजमध्ये भरणार आहे. दुपारी १२ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत विविध सत्रांमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यामध्ये प्रा. अशोक चक्रधर, डॉ. उदय प्रताप सिंह, डॉ. सच्चिदानंद जोशी, कैसर खलिद, रमेश शर्मा, संदीप नाथ, माया गोविंद, उदय प्रदीप सिंग आदी मंडळी आपले साहित्य सादर करणार आहेत. संमेलनाच्या निमित्ताने भव्य व्यासपीठ, आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे. त्यासाठी अद्ययावत सामग्री वापरली जाणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे. मात्र, प्रवेश निश्चित करण्यासाठी टोल फ्री क्रं. १८००१२००८०००० किंवा ccevents.pasaaneadab.com या संकेतस्थळावर नोंद करावी, असे आवाहन आयोजकांनी केलेले आहे.