दुर्गामातेच्या नऊ रुपांचे दर्शन घडवणाऱ्या 'नवस्वरूपा'चे अनूप जलोटांच्या हस्ते प्रकाशन
By संजय घावरे | Published: October 16, 2023 09:29 PM2023-10-16T21:29:43+5:302023-10-16T21:30:19+5:30
गायिका कृतिका श्रीवास्तव यांच्या आवाजातील हे गाणे नवरात्रीत संगीत प्रेमींचे लक्ष वेधून घेणारे आहे.
मुंबई- नवरात्रीच्या पावन पर्वाचे औचित्य साधत भजनसम्राट पद्मश्री अनुप जलोटा यांच्या हस्ते नवदुर्गा पावन स्तुती 'नवस्वरूपा'चे प्रकाशन करण्यात आले आहे. गायिका कृतिका श्रीवास्तव यांच्या आवाजातील हे गाणे नवरात्रीत संगीत प्रेमींचे लक्ष वेधून घेणारे आहे.
'नवस्वरूपा' दुर्गा मातेच्या नऊ स्वरूपांचे भक्तीमय वर्णन करणारे आहे. यात दुर्गामातेच्या विविध स्वरूपांचे वर्णन सुमधूर संगीताच्या आधारे सादर करण्यात आले आहे. प्रकाशन प्रसंगी 'नवस्वरूपा'चे कौतुक करत जलोटा म्हणाले की, कृतिकाचे गायन मी सर्वप्रथम भोपाळमध्ये ऐकले होते. त्यानंतर मी तिच्या पालकांना मुंबईत येऊन राहण्याचा सल्ला दिला. कृतिकाने दुर्गामातेची गायलेली संगीतमय प्रस्तुती सुरेल असल्याचा आनंद असल्याचेही जलोटा म्हणाले.
कृतिकाचे हे पहिलेच गाणे आहे. तिने कल्याण सेन यांच्याकडून संगीत आणि गायनाचे प्रशिक्षण घेतले आहे. विजय लाडेकर यांनी संगीतबद्ध केलेले हे गाणे विजय ऑफिशियर या यु टयूब चॅनेलवर पाहायला मिळेल. गीतकार शिवपूजन पटवा यांनी लिहिलेल्या या गाण्याचे दिग्दर्शन सनी मंडावरा यांनी केले आहे. कृतिकाचे कौटुंबिक मित्र आणि बऱ्याच बड्या व्यक्तींचे मीडिया मॅनेजर प्रीतम शर्मा यांच्या संकल्पनेतून 'नवस्वरूपा' आकाराला आले आहे.