अरुभैयांच्या आठवणी दाटून येतात - अनुराधा पौडवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 02:33 AM2019-05-09T02:33:55+5:302019-05-09T02:36:20+5:30
आज प्रत्येक गाणे सादर करताना अरुभैयांसोबतच्या आठवणी दाटून येतात, असे भावपूर्ण उद्गार ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांनी काढले.
मुंबई : आज प्रत्येक गाणे सादर करताना अरुभैयांसोबतच्या आठवणी दाटून येतात, असे भावपूर्ण उद्गार ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांनी काढले. अरुण दाते प्रथम स्मृतिदिनानिमित्त विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल येथे ‘अरुण दाते स्मृती रजनी’ कार्यक्रम पार पडला. त्या वेळी पौडवाल बोलत होत्या.
या कार्यक्रमात अनुराधा पौडवाल यांचा विशेष सहभाग होता. अरुण दाते यांच्यासोबत अनेक कार्यक्रमांतून गायलेली गाणी या कार्यक्रमात गाऊन त्यांनी दाते यांना स्वरांजली अर्पण केली. त्यांनी गायलेल्या ‘डोळे कशासाठी’ आणि ‘शुक्रतारा’ या गाण्यांना रसिकांकडून विशेष दाद मिळाली.
मंदार आपटे, श्रीरंग भावे, अर्चना गोरे यांनी गायलेल्या ‘स्वरगंगेच्या काठावरती’, ‘दिवस तुझे हे फुलायचे’, ‘पहिलीच भेट झाली’, ‘संधिकाली
या अशा’, ‘या जन्मावर’ अशा एकाहून एक सरस गाण्यांनी श्रोत्यांची
मने जिंकली. अरुण दाते यांच्या गाण्यांचे, ध्वनिमुद्रणाचे रसिकांनी कधीही न ऐकलेले किस्से सांगत त्यांचे पुत्र अतुल दाते यांनी दाते यांच्या स्मृतीस उजाळा दिला. अतुल यांनी आपल्या वडिलांवर लिहिलेल्या
‘हात तुझा हातातून’ या पुस्तकाचे प्रकाशन या सोहळ्यात करण्यात आले. या वेळी विलेपार्लेचे
आमदार पराग अळवणी, माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख, छत्रपती शिवाजी महाराज
स्मारक समितीचे अध्यक्ष डॉ. अरविंद रमेश प्रभू यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेत्री अनुश्री फडणीस यांनी केले.