Join us

अनुराग बागरी याची अनपेक्षित आगेकूच

By admin | Published: November 10, 2015 2:01 AM

अनुराग बागरी याने अनपेक्षित कामगिरी करताना माजी राष्ट्रीय सिक्स रेड स्नूकर विजेता पुण्याच्या शिवम अरोराला ४-२ असे नमवून

मुंबई : अनुराग बागरी याने अनपेक्षित कामगिरी करताना माजी राष्ट्रीय सिक्स रेड स्नूकर विजेता पुण्याच्या शिवम अरोराला ४-२ असे नमवून, महाराष्ट्र राज्य निवड सिक्स रेड स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्याच वेळी निखिल सैगल, हसन बदामी, इशप्रीत सिंग, आनंद रघुवंशी आणि मानव पांचाळ यांनी विजयी आगेकूच केली.वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये सुरूअसलेल्या या स्पर्धेत अनुरागने कसलेल्या शिवमला धक्का देत, सनसनाटी विजय मिळवला. २-० अशी चमकदार आघाडी घेतल्यानंतर, शिवमने तिसऱ्या गेम जिंकून १-२ अशी पिछाडी कमी केली. पुन्हा एकदा अनुरागने बाजी मारत ३-१ अशी आघाडी घेतली. चौथ्या गेममध्ये मात्र, शिवमने जबरदस्त पॉकेट करताना ३८-० असा गेम जिंकला. २-३ अशा पिछाडीवरून शिवम पुनरागमन करणार असे दिसत असताना अनुरागने सहाव्या गेममध्ये मोक्याच्या वेळी खेळ उंचावून अखेर ३३-१८, ४७-०, ०-४४, ३४-२६, ०-३८, ५१-३९ अशी बाजी मारली.अनुभवी हसन बदामीने एकतर्फी सामन्यात व्ही. सुब्रमणीयमचा ३५-८, ३६-११, ३४-२, ३०-२६ असा फडशा पाडला, तर इशप्रीत सिंगने आपल्या अनुभवाच्या जोरावर बाजी मारताना हरमेहर मागोचे आव्हान ३६-१२, ४०-३३, ३४-४१, ७-३७, ३०-१४, ४१-१८ असे परतवले. सात गेमपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात निखिल सैगलने झुंजार खेळाचे प्रदर्शन करताना, चिंतामणी जाधवचा ३९-०, ४९-२५, २२-४२, २१-२९, ५०-३७, ५९-७ असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्याच वेळी आनंद रघुवंशीने रोहन सहानीचा ४-१ असा धुव्वा उडवला, तर मानव पांचाळने सहजपणे विजयी आगेकूच करताना, क्रिश गुरबक्षणीचा ४-० असा फडशा पाडून आगेकूच केली. (क्रीडा प्रतिनिधी)