Anushakti Nagar Vidhan Sabha Result 2024: स्वरा भास्करचा पती फहाद अहमद विरुद्ध सना मलिक, निकाल काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 03:38 PM2024-11-23T15:38:57+5:302024-11-23T15:42:03+5:30
Anushakti Nagar Election Result : अणुशक्ती नगर मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशीच लढत होती. या मतदारसंघात मनसे आणि वंचितने लक्षणीय मते घेतली आहेत.
Anushakti Nagar Election Result 2024: अनुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघात महायुतीने गुलाल उधळला आहे. अनुशक्तीनगर मतदारसंघाचे चित्र स्पष्ट झाले असून, केवळ घोषणेची औपचारिकता बाकी राहिली आहे. अंतिम फेरी अखेर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार विजयी झाला आहे. सना मलिक यांना अंतिम फेरीअखेर ३ हजार ३७८ मताधिक्य मिळाले आहे. निवडणूक आयोगाकडून निकालाची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.
अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सना मलिक आणि महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे उमेदवार फहाद अहमद हे मैदानात होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नवीन आचार्य यांना उमेदवारी दिली होती.
अणुशक्तीनगर विधानसभा निकाल, कोणाला किती मते?
अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघात मतमोजणीच्या एकूण १९ फेऱ्या होत्या. अंतिम म्हणजे १९ व्या फेरीअखेर सना मलिक यांना ३३७८ इतके मताधिक्य मिळाले. सना मलिक यांना ४९ हजार ३४१ मते मिळाली आहेत. तर फहाद अहमद यांना ४५ हजार ९६३ मते मिळाली आहेत. मनसेचे नवीन आचार्य यांना २८ हजार ३६२ मते मिळाली.
या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारालाही भरपूर मते मिळाली आहेत. वंचितचे सतीश वामन यांना १० हजार ५१४ मते मिळाली आहेत.
मनसे-वंचित ठरली महत्त्वाची
अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी लक्षणीय मते घेतली आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार फहाद अहमद हे ३३७८ मतांनी मागे राहिले, तर वंचितच्या उमेदवाराने १० हजार, तर मनसेनेही २८ हजार मते घेतली आहेत. ही मते या मतदारसंघाचा निकाल ठरवण्यात महत्त्वाची ठरली आहेत.