मुंबई : कचरा रस्त्यावर टाकल्याप्रकरणी जाब विचारला म्हणून अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि तिचा पती भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याला अरहान सिंह या व्यक्तीने कायदेशीर नोटीस पाठिवली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी विराट कोहलीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. यामध्ये अनुष्का शर्माने गाडीतून कचरा रस्त्यावर फेकणा-या अरहान सिंह याला सुनावले होते. दरम्यान, याप्रकरणी अरहान सिंह याने सोशल मीडियावर माझी बदनामी केल्याच्या आरोपाखाली अनुष्का आणि विराट यांना कायदेशीर नोटीस पाठविली आहे. माझ्या कायदेशीर सल्लागारांनी अनुष्का आणि विराटला कायदेशीर नोटीस पाठविली आहे. यासंदर्भातील निर्णय कोर्टातच होईल. त्यामुळे यावर आता मी काही प्रतिक्रिया देणार नाही. सर्वकाही निर्दोष आहे, तर मला त्यांच्या प्रतिक्रियेची वाट पाहिली पाहिजे, असे अरहान सिंह याने म्हटले आहे.
दरम्यान, अनुष्का शर्मा आपल्या कारमधून प्रवास करत असताना एका दुस-या कारमधून जाणा-या अरहान सिंह या व्यक्तीने रस्त्यावर कचरा फेकला. यावेळी अनुष्का शर्माने त्या कारला थांबविले आणि कचरा फेकणा-या अरहान सिंहवर चांगलीच भडकली. तिने रस्त्यावर कचरा का टाकला, असा सवाल करत डस्टबीनमध्ये टाकण्याचा सल्ला दिला. यावेळी तिचा व्हिडीओ बहुतेककरुन विराटने काढला आणि सोशल मीडियावर शेअर केला. यावेळी विराटने म्हटले की, या लोकांना रस्त्यावर कचरा टाकल्यानंतर त्यांना योग्य प्रकारे फटकारले. महागड्या कारमध्ये प्रवास करतात पण यांची बुद्धी खराब आहे. अशा व्यक्ती आपला देश स्वच्छ नाही ठेवू शकत का? जर तुम्ही देखील असे होताना पाहिले तर असेच करा. जनजागृती पसरवा.