अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:19 AM2020-12-04T04:19:20+5:302020-12-04T04:19:20+5:30
दोषारोपपत्र दाखल करण्यास स्थगिती द्यावी अर्णब गोस्वामी यांची उच्च न्यायालयात याचिका दोषारोपपत्र दाखल करण्यास स्थगिती द्यावी अन्वय नाईक आत्महत्या ...
दोषारोपपत्र दाखल करण्यास स्थगिती द्यावी
अर्णब गोस्वामी यांची उच्च न्यायालयात याचिका
दोषारोपपत्र दाखल करण्यास स्थगिती द्यावी
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण : अर्णब गोस्वामी यांची उच्च न्यायालयात याचिका
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात आरोपी असलेले रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल करण्यास व पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यास स्थगिती मिळावी, यासाठी उच्च न्यायालयात तातडीने अर्ज दाखल केला आहे.
अलिबाग पोलिसांनी गेल्याच वर्षी हे प्रकरण बंद केले असताना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना राज्य सीआयडीला या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्याचे आदेश देण्याचा अधिकार नाही, असा दावा गोस्वामी यांनी अर्जात केला. नाईक आत्महत्या प्रकरणात गोस्वामी आरोपी असून गेल्याच महिन्यात त्यांना अलिबाग पोलिसांनी अटक केली होती आणि सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.
राज्य सरकारने आकसापोटी बंद केलेल्या प्रकरणाचा तपास पुन्हा करण्याचे आदेश दिले. ‘ए’ समरी अहवाल सादर केला असताना आणि विशेषतः मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी तो स्वीकारला असताना फेरतपास करण्याचे आदेश देण्याचा अधिकार गृहविभागाला नाही किंवा अन्य कोणत्याही विभागाला नाहीत, असे गोस्वामी यांनी याचिकेत म्हटले आहे.
नोव्हेंबरमध्ये अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन गोस्वामी यांच्यावर दोषारोपपत्र दाखल करू, असे जाहीर केले. याचा अर्थ राज्य सरकार या तपासात हस्तक्षेप करत आहे. न्यायालयाच्या परवानगीशिवाय फेरतपासाचे आदेश देऊ शकत नाही. त्यामुळे सीआयडी करत असलेला तपास बेकायदेशीर आहे, असे गोस्वामी यांनी याचिकेत नमूद केले.
एफआयआर रद्द करण्यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत सुधारणा करण्याची परवानगी द्यावी. तसेच दोषारोपपत्र दाखल करण्यास व पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यास स्थगिती द्यावी, अशी मागणीही गोस्वामी यांनी न्यायालयाला केली.