"मुकेश अंबानींच्या सुरक्षेवरून आक्रमक होणारे विरोधक अन्वय नाईक प्रकरणात गप्प का?"
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 12:05 PM2021-03-11T12:05:36+5:302021-03-11T12:09:52+5:30
anvay naik death case: पोलिसांचं तोंड काळं झालं ही भाषा फडणवीसांना शोभते का?; अन्वय नाईक यांच्या कुटुंबाचा सवाल
मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानींच्या (Mukesh Ambani) घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या गाडीचा तातडीनं तपास होतो. त्या प्रकरणी लगेच कारवाई होते. मग अन्वय नाईक यांच्या आत्महत्येला (anvay naik death case) तीन वर्षे उलटूनही दोषी मोकाट कसे फिरतात?, असा सवाल अन्वय यांच्या पत्नी आणि मुलीनं उपस्थि केला. अन्वय यांच्या पत्नी अक्षता आणि मुलगी आज्ञा यांनी आज पत्रकार परिषद घेत लवकरात लवकर न्याय देण्याची मागणी केली. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण दाबण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी फडणवीस सरकारवर केला.
मुकेश अंबानी यांच्या घरापासून ५०० मीटरवर जिलेटिननं भरलेली गाडी सापडल्यावर विधानसभेत आक्रमक होणारा, गदारोळ करणारा पक्ष आमच्या प्रकरणात शांत का?, असा सवाल नाईक मायलेकींनी उपस्थित केला. मुकेश अंबानींच्या सुरक्षेवरून सीडीआर काढणारे आमच्या प्रकरणाकडे दुर्लक्ष का करत आहेत? गुन्ह्यातील आरोपी तुमचे नातेवाईक आहेत का? न्याय केवळ श्रीमंतांनाच मिळणार का, असे अनेक प्रश्न अक्षता आणि आज्ञा नाईक यांनी विचारले आहेत.
देवेंद्र फडणवीस फॉर्मात! महाविकास आघाडीच्या आणखी एका मंत्र्याला दणका
अर्णब गोस्वामींच्या रिपब्लिक टीव्हीचा स्टुडिओ अन्वय नाईक यांनी उभारून दिला. त्याचे पैसे थकवल्यानं, गोस्वामींनी धमक्या दिल्यानं अन्वय नाईक यांनी आत्महत्या केली. या प्रकरणाला ३ वर्ष उलटूनही अद्याप आम्हाला न्याय मिळालेला नाही. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांवर, महाराष्ट्र पोलिसांवर आमचा पूर्ण विश्वास आहे. मात्र पोलिसांचं तोंड काळं झालं असं फडणवीस म्हणतात. असं बोलणं फडणवीस यांना शोभतं का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
गेल्या सरकारनं अन्वय नाईक प्रकरण दाबल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिवेशनात म्हणाले. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य आहे. गेल्या सरकारमध्ये आरोपींना अटकदेखील झाली नव्हती. आरोपींना पोलीस मुख्यालयात बोलावून त्यांची चौकशी करण्यात आल्याचं आम्हाला सांगण्यात आलं. आरोपींना इतकी स्पेशल ट्रिटमेंट कशी दिली आणि ती त्यावेळी कोणाच्या आदेशावरून दिली गेली, असे सवाल विचारत अक्षता आणि आज्ञा नाईक यांनी अप्रत्यक्षपणे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं.