क्रौर्याचा नंगानाच अन् माणुसकीची झोप...!
By admin | Published: July 24, 2014 12:29 AM2014-07-24T00:29:20+5:302014-07-24T00:31:38+5:30
साखरोळी हल्ला : बहिष्कार टाकलेल्या कुटुंबाला माणुसकीच्या नात्यातूनही मदत नाही
शिवाजी गोरे- दापोली
देवदेवस्की व प्रॉपर्टीच्या वादातून रमेश मिसाळ यांच्यावर मध्यरात्री हल्ला करण्यात आला. त्यांचा जागीच मृत्यू झाला. मोठा मुलगा रूपेश हल्ल्यात गंभीर जखमी, तर दुसरा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात घरात निपचित पडलेला. वाचवा वाचवा म्हणत प्रणया मिसाळ वाडीतील गाडीवाल्याच्या घरी धावत गेली, परंतु गाडीवाल्याने डिझेल संपले आहे, असे सांगून दार बंद केले. बहिष्कार टाकलेल्या कुटुंबाला मदत करायची नाही, असा वाडीचाच अलिखित ठराव झाल्याने मिसाळ कुटुंबीयाच्या जीवन-मरणाची लढाई सुरू असताना वाडीतील एकही माणूस तिकडे फिरकला नाही.
रमेश मिसाळ यांच्या कुटुंबावर गेल्या काही वर्षांपासून वाडीतील सर्व लोकांनी बहिष्कार टाकला होता. हत्याकांडाने अख्खा तालुका हादरून गेल्याने बहिष्कार टाकण्यामागील कारणांचा उलगडा झालेला नाही. बहिष्कृत कुटुंबाला मदत करायची नाही, असा अलिखित ठराव झाल्याने तीन निष्पाप जीव वाचविण्यासाठी धावा करत होते, तरी त्यांच्यासाठी गावातील कोणीही पुढे आले नाही.
रमेश मिसाळ यांची पत्नी रुचिता व रूपेश मिसाळ यांची पत्नी प्रणया या दोन्ही महिला प्रत्येकाचे दार
ठोठावत लोकांकडे मदतीची याचना करीत होत्या. मात्र, गाडीतील डिझेल संपले असे म्हणून लगेच दारही बंद करून घेतले. एवढा भयानक प्रकार घडूनसुद्धा काही घडलेच नाही, असे भासविण्यात आले. रमेश मिसाळांचा मृतदेह दिवसभर रुग्णालयात होता. रूपेश व प्रफुल्ल मृत्यूशी झुंज देत आहेत.
अंत्यसंस्कारावरही बहिष्कार...
रमेश मिसाळ यांच्यावर रात्री उशिरा गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याहीवेळेस गावातील केवळ दोन ते तीन लोकच उपस्थित होते. गावातील अन्य लोकांनी अंत्यसंस्कारालाही हजेरी लावली नाही.
योग्य तेच केले, आरोपींचे निर्लज्ज समर्थन!
एवढा गंभीर प्रकार हातून झाल्यावरही आरोपींच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाचा लवलेश नाही. उलट रमेश मिसाळला ठार केले, ते बरे झाले. त्यानेच भोंदूगिरी करून माझ्या वडिलांना मारले. त्यामुळे आम्ही हे कृत्य केले, असे वक्तव्य आरोपी करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस कोठडीत रवानगी
एकाला ठार करून तिघांना जखमी केल्याच्या संशयावरून आरोपी सचिन संतोष मिसाळ, किरण संतोष मिसाळ, महेश शंकर मिसाळ, मीनाक्षी महेश मिसाळ, राधिका सचिन मिसाळ, सुनंदा संतोष मिसाळ व योगिता संतोष मिसाळ या सातजणांना दापोली न्यायालयात हजर केले असता दापोली न्यायालयाने सातही आरोपींना दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.