Join us

चिंता, हुरहूर अन् अश्रू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 4:07 AM

पी-३०५ बार्जचा अपघात; मृतांच्या कुटुंबियांची जे. जे. रुग्णालय शवागराबाहेर गर्दीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : तौक्ते वादळाच्या तडाख्यानंतर बॉम्बे ...

पी-३०५ बार्जचा अपघात; मृतांच्या कुटुंबियांची जे. जे. रुग्णालय शवागराबाहेर गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : तौक्ते वादळाच्या तडाख्यानंतर बॉम्बे हायनजीक ‘पी ३०५’ हा तराफा समुद्रात बुडाला. या तराफ्यावरील २६१ कर्मचाऱ्यांनी प्राण वाचविण्यासाठी जीवरक्षक जॅकेट घालून समुद्रात उड्या मारल्या… आणि त्यानंतर या कर्मचाऱ्यांच्या सुटकेचा थरार... आपल्या कुटुंबीयातील व्यक्तींच्या जिवासाठी होणारी घालमेल... अथांग समुद्रात प्रत्येक श्वासासाठी लढणारे कर्मचारी... अशी काळजाचा ठाव घेणारी स्थिती निर्माण झाली.

पी-३०५ तराफा बुडाल्यानंतर या घटनेतील मृतदेह जे. जे रुग्णालयातील शवागरात ठेवण्यात आले. बुधवारपासून ते गुरुवारी रात्री नऊ वाजेपर्यंत ३६ मृतदेह रुग्णालयातील शवागरात आणण्यात आल्याची माहिती जे. जे. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे यांनी दिली. यानंतर तराफ्यावर कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या काळजीने जे. जे रुग्णालय शवागराबाहेर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी गर्दी केल्याचे दिसून आले.

तराफ्यातील कर्मचाऱ्यांशी संपर्क करण्यासाठी कुटुंबीय अहोरात्र धडपड करत होते. मात्र रात्रीचा दिवस उजाडूनही अनेकांशी संपर्क होऊ शकला नव्हता. अशा वेळेस या कुटुंबीयांनी घाबरून नौदल कक्ष आणि रुग्णालयांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. अखेर, बुधवारी सकाळपासून जे. जे. रुग्णालय शवागराबाहेर ते अश्रूंना आवरत मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी जमा झाले होते. प्रत्येकाच्या मनात धाकधूक होती. आपल्या कुटुंबीयातील सदस्य सुरक्षित असावा, अशी प्रार्थना करत ते देवाचा धावा करत हाेते. काही माऊलींचा जीव कंठाशी आला हाेता.

शवागराबाहेर सुरक्षेच्या कारणास्तव असणारे पोलीस दलातील कर्मचारीही कुटुंबीयांना धीर देताना दिसत होते.