मुंबई: काल मध्यरात्री साडेतीन वाजता पाकिस्तान गाढ झोपला असताना, आपल्या वायुदलाच्या १२ लढाऊ मिराज विमानांनी २१ मिनिटे पाकिस्तानात शिरून जैश ए मोहम्मदचा अतिरेकी अड्डा उद्ध्वस्त करून ३५० अतिरेक्यांना कंठस्नान घातले. त्यांच्या या कामगिरीचे मी कौतुक करतो. मात्र जवानांच्या शौर्याचे श्रेय कोणत्याही राजकीय पक्षांनी घेऊ नये असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज रात्री प्रभादेवी येथे केले. तसेच आपला वैमानिक अभिनंदन याला पाकिस्तानने जेरबंद केले. त्याची लवकर सुखरूप सुटका केली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. स्थानीय लोकाधिकार समिती महासंघातर्फे आज सायंकाळी प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिरात मराठी भाषा दिवस उत्साहात साजरा केला. त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.
पुलवामात १४ फेब्रुवारीला दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला. त्यात 40 जवान धारातीर्थी पडले. यावेळी युतीची बोलणी सुरू होती. त्यावरुन भाजपा आणि शिवसेनेवर जोरदार टीका झाली. यावरही उद्धव यांनी भाष्य केले. 'युती होत नव्हती त्यावेळी टीका सुरू होती. युती झाल्यावरदेखील टीका सुरू आहे. जर युती झाली नसती, तर ५० वर्षे राज्य केलेल्या काँग्रेसच्या हातात देश गेला असता आणि हिंदुत्व मागे पडले असते,' असे उद्धव म्हणाले. यावेळी स्थानीय लोकाधिकार समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे उद्धव यांनी कौतुक केले. मराठी भाषा दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात सुप्रसिद्ध राष्ट्रीय व्याख्याते चारूदत्त आफळे यांनी मराठी भाषा व हिंदुत्व या विषयावर वास्तववादी व्याख्यान केले. त्यास रसिकांनी मन:पूर्वक दाद दिली. तसेच राजकीय उपहासकार रामदास फुटाणे आणि हास्यकवी अशोक नायगावकर यांच्या कवितांचा मार्मिक सामना या नाविण्यपूर्ण कार्यक्रमास उपस्थित रसिकांना खळखळून दाद दिली. कार्यक्रमाच्या सुरूवातीला पुलवामा स्फोटातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. यानंतर नियंत्रण रेषा ओलांडून दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या हवाई दलाच्या शौर्याला टाळ्यांच्या कडकडाटात दाद देण्यात आली. यावेळी भारतमाता की जय, वंदे मातरम् या घोषणांनी नाट्यगृह दणाणून गेले.यावेळी शिवसेना नेते मनोहर जोशी, लिलाधर डाके, परिवहनमंत्री दिवाकर रावते, खासदार गजानन कीर्तिकर, खासदर आनंदराव अडसूळ,शिवसेना सचिव व खासदार अनिल देसाई, महाराष्ट्र राज्य शासनचे राज्यमंत्री रविंद्र वायकर,राज्यमंत्री गुलाबराव पाटील,राज्यमंत्री दादाजी भूसे, राज्यमंत्री विजय शिवतारे,शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर,शिवसेना सचिव आदेश बांदेकर, खासदार राहूल शेवाळे, आमदार विलास पोतनीस, आमदार सदा सरवनकर उपनेत्या विशाखा राऊत, मिना कांबळी, स्थानिक शिवसेना पदाधिकारी, लोकाधिकार महासंघाचे पदाधिकारी आणि संलग्न समित्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.