Join us

'राज्यातील कुठलाही सरपंच मुख्यमंत्र्यांपेक्षा हुशार अन् कायद्याचं ज्ञान असलेला'

By महेश गलांडे | Published: February 24, 2021 8:29 PM

संजय राठोड हे मंदिरात गेले, मंदिरात जायला ते काही संत आहेत का?. या सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचार आणि बलात्काराच्या प्रकरणात वाढ झाली आहे. मात्र, कोणावरही कारवाई केली जात नाही

ठळक मुद्देसंजय राठोड हे मंदिरात गेले, मंदिरात जायला ते काही संत आहेत का?. या सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचार आणि बलात्काराच्या प्रकरणात वाढ झाली आहे. मात्र, कोणावरही कारवाई केली जात नाही

मुंबई - पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात (Pooja Chavan Suicide Case) आरोप झाल्यानंतर बेपत्ता झालेले वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी मंगळवारी सर्वांसमोर येत पोहरादेवी येथे जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. मात्र, या शक्तिप्रदर्शनामुळे महाविकास आघाडीमधील ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) हे नाराज झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तर, या शक्तीप्रदर्शानंतर भाजपा नेत्यांनीही ठाकरे सरकारवर जोरदार टीका केलीय. आता, खासदार नारायण राणे यांनीही संजय राठोड यांच्यावर टीका करताना, मुख्यमंत्र्यांना टार्गेट केलंय. 

संजय राठोड यांच्या समर्थनार्थ झालेल्या शक्तिप्रदर्शनानंतर आज मंत्री संजय राठोड कॅबिनेटच्या बैठकीसाठी रवाना झाले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करून शरद पवार यांच्या नाराजीबाबत विचारले असता संजय राठोड म्हणाले की, शरद पवार यांच्या नाराजीबाबत मला काही बोलायचे नाही. मी जे काही बोलायचं आहे ते काल बोललो आहे. काल सांगितल्याप्रमाणे आजपासून मी माझ्या शासकीय कामांना सुरुवात करणार आहे. आता मी मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी मुंबईत जात आहे. त्यानंतर, त्यांनी बैठकीला हजेरी लावली. दरम्यान, खासदार नारायण राणे यांनी संजय राठोड हे काही संत आहेत का, अशा शब्दात त्यांच्यावर टीका केली. तसेच, याप्रकरणी 11 ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्या असून अद्यापही सरकारने कारवाई का केली नाही, असा सवाल राणेंनी विचारला आहे. 

संजय राठोड हे मंदिरात गेले, मंदिरात जायला ते काही संत आहेत का?. या सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचार आणि बलात्काराच्या प्रकरणात वाढ झाली आहे. मात्र, कोणावरही कारवाई केली जात नाही. सुशांतप्रकरणातही काय झालं, आता पूजा चव्हाण प्रकरणातही तेच होतंय. कुठल्याही समाजाने अशाप्रकारे बलात्काराच्या आरोपातील व्यक्तीच्या पाठिशी उभे राहू नये, असे आवाहनही राणेंनी केले. तसेच, हे सरकार शरद पवारांमुळेच बनलंय, त्यांच्यामुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आहेत. उद्धव ठाकरेंपेक्षा राज्यातील कुठलाही सरपंच हुशार आणि कायद्याचं अधिक ज्ञान असणारा आहे, असे म्हणत राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. तसेच, असले कसे वाघ, हे वाघ मातोश्रीवर किंवा पिंजऱ्यात घाला, असे म्हणत संजय राठोड यांच्यावर कारवाईची मागणीही राणेंनी पत्रकार परिषदेत केलीय. 

शरद पवार नाराज

दरम्यान, पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे अडचणीत आलेले वनमंत्री संजय राठोड यांच्या समस्यांमध्ये आणखी वाढ होण्याची चिन्हं आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शिवसेना नेते संजय राठोड यांच्यावर नाराज असल्याचं समजतं. काल शरद पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यावेळी त्यांनी राठोड यांच्याबद्दल स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली.

मुख्यमंत्रीही नाराज

संजय राठोड यांच्यावर झालेले आरोप अतिशय गंभीर स्वरुपाचे आहेत. त्यामुळे पोलीस तपास पूर्ण होईपर्यंत त्यांनी मंत्रिपदापासून दूर व्हावं. संजय राठोड यांच्यावरील आरोपांचा परिणाम मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिमेवर होत असल्याचं पवार यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं. गेल्या १५ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या राठोड यांनी काल पोहरादेवीला भेट दिली. त्यावेळी तिथे हजारो लोक उपस्थित होते. राठोड यांच्याकडून करण्यात आलेल्या शक्तिप्रदर्शनावर मुख्यमंत्रीदेखील नाराज असल्याचं समजतं. 

टॅग्स :नारायण राणे मुंबईपूजा चव्हाणसंजय राठोड