Ajit Pawar: औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरुन गेल्या काही दिवसांपासून राज्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. अशातच मुस्लीम बांधवाचा पवित्र रमजानचा महिना असल्याने प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. दुसरीकडे विविध राजकीय पक्षांकडून इफ्तार पार्ट्यांचे आयोजन देखील करण्यात येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनही इफ्तारचे आयोजन करण्यात येतं. शुक्रवारी राष्ट्रवादीच्या इफ्तार पार्टीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हजेरी लावली होती. यावेळी बोलताना त्यांनी मुस्लिमांना डोळे दाखवणाऱ्यांना सोडणार नाही, असं म्हटलं. त्यांच्या या विधानाची आता जोरदार चर्चा सुरु आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात धार्मिक तेढ वाढवणाऱ्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशातच नागपुरात औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरुन मोठा हिंसाचार झाला. त्यामुळे सर्वच स्तरातून शांतता राखण्याचे आयोजन करण्यात येत आहे. शुक्रवारी नरिमन पॉईंट येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अजित पवार यांनी रमजान हा समता, त्याग, समर्पण आणि बंधुत्वाची भावना निर्माण करणारा पवित्र महिना असल्याचे म्हटलं. तसेच दोन गटामध्ये भांडण लावणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडलं जाणार नाही असा इशाराही अजित पवार यांनी यावेळी दिला.
"समता, त्याग, समर्पण आणि बंधुत्वाची भावना निर्माण करणारा हा पवित्र महिना आहे. रमजान केवळ एका धर्मापुरता मर्यादित नाही. रमजान आपल्याला त्याग, एकता आणि बंधुत्वाची संदेश देतो. भारत विविधतेमध्ये एकतेच प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि शाहू महाराज यांनी जातींना एकत्र घेऊन समाजाच्या उन्नतीचा मार्ग दाखवला. आपल्याला हाच वारसा पुढे न्यायचा आहे," असं अजित पवार म्हणाले.
"आपण नुकतीच होळी साजरी केली आहे. आता गुढीपाडवा आणि ईद येणार आहे. हे सर्व सण आपण एकत्र साजरे केले पाहिजेत. कारण एकता हीच आपली खरी ताकद आहे. तुमचा भाऊ अजित पवार तुमच्या पाठीशी आहेत, याची मी खात्री देतो," असंही अजित पवार म्हणाले.
"आमच्या मुस्लिम बंधू-भगिनींना जो कोणी डोळा दाखवेल, दोन गटात भांडण लावून कायदा व्यवस्था बिघडवणार आणि कायदा आपल्या हातात घ्यायची गोष्ट करणार, तो जो कोणी असेल त्याला कोणत्याही परिस्थितीत सोडलं जाणार नाही. माफ केलं जाणार नाही," असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.
अजित पवारांनी शेअर केले इफ्तार पार्टीचे फोटो
"रमजाननिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आयोजित दावते-ए-इफ्तारमध्ये सहभागी झालो. या विशेष कार्यक्रमात सर्व समाज घटकाचे लोक मोठ्या आनंदानं सामील झाले त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि शुभेच्छा देतो," असं म्हणत अजित पवार यांनी इफ्तार पार्टीचे फोटो शेअर केले आहेत.