'राजकारणात काहीही घडू शकतं'; राज ठाकरेंच्या वक्तव्यावर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 03:37 PM2021-06-02T15:37:48+5:302021-06-02T15:40:02+5:30
राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर आता शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया आली आहे.
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येणार का? हा प्रश्न सर्वांच्या भावनिक जिव्हाळ्याचा होऊन बसला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray ) यांना मंगळवारी एका वेबिनारमध्ये हाच प्रश्न पुन्हा एकदा विचारण्यात आला असता त्यांनी अगदी दोनच शब्दांत मार्मिक उत्तर दिलं आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येणार का? असं विचारलं असता राज ठाकरे यांनी 'परमेश्वरास ठाऊक' अशा दोनच शब्दांत उत्तर दिलं. आत्ता सध्याचा काळ पाहता या प्रश्नांची उत्तरं नाहीत. इतर कुणाकडेही असतील असं वाटत नाही, असंही राज ठाकरे यांनी सांगितले.
राज ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर आता शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया आली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? हा प्रश्नच मला आशावादी वाटत नाही. त्यांना हा प्रश्न का विचारण्यात आला?, त्यावर राज यांनी का उत्तर दिलं? हे त्यांनाच माहीत, असं अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे. निवडणुकीच्या आधी आणि नंतरही या चर्चा होत असतात. आता मीडिया चर्चा करत आहेत, असं सांगत सगळ्याच गोष्टी भविष्यात बघितल्या जातील, असं अरविंद सावंत यांनी सांगितलं. यासोबतच समाजकारण आणि राजकारणात काहीही घडू शकतं, असं विधानही अरविंद सावंत यांनी केलं आहे.
मनसेमुळे राज ठाकरे
पक्ष हा के वळ नेत्यामुळे नसतो. कार्यकर्त्यांचे जाळे हे महत्त्वाचे असते. नेत्यावरून पक्ष ओळखला जात नाही तर पक्षामुळे नेत्याची ओळख होते. नेत्याकडे बघून जरूर मतदान होते. पण शेवटी पक्षाची ताकद महत्त्वाची असते. मोदींकडे बघून लोक भाजपला मतदान करतात, पण शेवटी भाजपची संघटनात्मक ताकद आहेच. राज ठाकरे यांचे जे काही नेतृत्व आहे ते मनसेमुळे आहे. मनसे म्हणजे राज ठाकरे नव्हे तर मनसेमुळे राज ठाकरे आहे.
मुंबई महापालिका निवडणूक पूर्ण ताकदीनं लढणार
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील युतीबाबत राज ठाकरे यांना विचारण्यात आलं असता त्यांनी सध्या तुमच्या हातात काहीच नाही. त्यामुळे खरंच काही सांगता येत नाही. राज्यात सध्या नेमकं कोण राजकीय विरोधक आणि कोण मित्र हेच कळायला मार्ग नाही. कोण कुठल्या बिळातून बाहेर येईल हे समजत नाही. जेव्हा वेळ येईल तेव्हा बघू, असं राज ठाकरे म्हणाले. निवडणुका येईपर्यंत मनसेची वाटचाल एक पक्ष म्हणून असेल आणि हा मला डोळा मारतोय का, तो पत्र पाठवतोय का, यावर माझी वाटचाल नसेल, असंही राज ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं.