मुंबई - दोन-तीन दिवसांच्या धुवाधार पावसाने मुंबईचे जनजीवन मंगळवारी ठप्प केले. संपूर्ण जून महिन्याची सरासरी पावसाने फक्त 24 तासांत ओलांडल्यावर दुसरे काय होणार? एखाद्या दुर्घटनेचे राजकारण करण्याचे ‘गजकरणी’ प्रकार धोकादायक आहेत. प्रचंड कोसळणारा पाऊस मालाडसारख्या जीवघेण्या दुर्घटनांचा दगाफटका देतो. धोकादायक इमारती, ‘संरक्षक’ भिंती हे दरवर्षी निरपराधांसाठी ‘पावसाळय़ातील यमदूत’ का ठरावेत? असं सांगत अहमदाबाद काय, नागपूर काय या शहरांमध्येही ही स्थिती उद्भवली आहेच. पण मुंबईत काही खुट्ट जरी घडले तरी त्यासाठी शिवसेना आणि मुंबई महापालिका यांना जबाबदार धरण्याची जुनीच फॅशन आहे असा टोला सामना संपादकीयमधून विरोधकांना लगावला आहे.
पावसाळय़ात मुंबईकरांचे रुटीन सुरळीत राहावे, दुर्घटना घडू नयेत यासाठी मुंबई महापालिका आणि प्रशासन योग्य ती काळजी दरवर्षीच घेत असते. मुंबई महापालिकेने या दोन–तीन दिवसांत उत्तम काम केले. कर्मचारी वर्ग दिवसरात्र शर्थ करून तुंबलेले पाणी समुद्रात सोडत होते. सहा पंपानी 14 दशलक्ष लिटर्स पाणी उपसल्यामुळे 26 जुलैसारखा अनर्थ टळला अशा शब्दात मुंबई महापालिकेची पाठराखण केली आहे.
- सामना संपादकीयमधील महत्वाचे मुद्दे
- आमचे हृदय हेलावून गेले ते भिंती कोसळून झालेल्या दुर्घटनांनी. मालाडमध्येही मंगळवारी संरक्षक भिंत कोसळून 19 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्रचंड पाऊस आणि त्यामुळे निर्माण झालेला पाण्याचा मोठा रेटा यामुळे तेथे बांधलेली संरक्षक भिंत कोसळली आणि 19 जणांचा जीव गेला.
- मुंबईतील मालाडमधील दुर्घटना मध्यरात्री घडली. कोसळणारा पाऊस, वेगाने भिंतीवर आदळणारा पाण्याचा लोंढा, त्याचा भयंकर आवाज आणि मृत्यूने अचानक केलेला हल्ला यामुळे झोपडय़ांमध्ये झोपलेल्या जिवांना किंकाळय़ा फोडण्याचीही उसंत मिळाली नसावी. भिंतीच्या ढिगाऱयाखाली त्या किंकाळय़ा आणि मदतीच्या हाकाही दबल्या गेल्या.
- या दुर्घटनेचीही जी काही चौकशी व्हायची ती होईलच; पण यातील करुण किंकाळय़ांचेही राजकारण करण्याचा विरोधक आणि टीकाकारांचा प्रयत्न घृणास्पद आहे. अर्थात शिवसेनेची आणि भगव्याची कावीळ झालेले दुसरे काय करणार?
- वास्तविक मालाड येथील दुर्घटना ही सोमवारी रात्री जो प्रचंड पाऊस झाला त्यामुळेच घडली हे उघड आहे. ती घडायला नको होती हे खरेच; पण त्या रात्री पाऊसच अभूतपूर्व झाला. दुर्घटना जेवढी गंभीर तेवढाच रात्री कोसळलेला पाऊसदेखील प्रचंड होता.
- फक्त त्या चार-पाच तासांत 375 ते 400 मिलीमीटर एवढा पाऊस अक्षरशः कोसळला. त्यामुळेच पाण्याचा जलद प्रवाह आणि त्याचा तेवढाच प्रचंड रेटा निर्माण होऊन संरक्षक भिंत कोसळली.
- इतक्या कमी वेळात एवढा मोठा पाऊस यापूर्वी 1974मध्ये झाला होता. नंतर 2005मध्ये 26 जुलैचा जलप्रलय मुंबईने अनुभवला आणि आता सोमवारी कमी वेळात प्रचंड पावसाने मुंबईला पुन्हा झोडपले. अशा परिस्थितीत शहर, राज्य कुठलेही असो ते जलमय होणारच. दुर्घटना घडण्याचा धोका अशा वेळी जास्त असतो.
- मुंबईतील सखल भागांत पाणी साचण्यापासून मालाडच्या दुर्घटनेपर्यंत सगळय़ाचे खापर शिवसेनेवर फोडण्याचे नेहमीचे उद्योग आताही सुरूच आहेत. संपूर्ण जून महिन्याची सरासरी ओलांडणारा पाऊस मुंबईवर या दोन-तीन दिवसांत शिवसेनेमुळेच कोसळला, असा आरोप अद्याप विरोधकांनी केलेला नाही हे नशीबच!
- वास्तविक, कमी वेळेत अतिवृष्टी झाली की मुंबईची ही स्थिती का होते, त्यासाठी अनेक यंत्रणा आणि यापूर्वीच्या सरकारांची धोरणेही कशी जबाबदार आहेत हे उघड सत्य आहे. तरीही फक्त शिवसेनेवर टीका करणे एवढे एकच काम असल्याने त्यांचे ते प्रकार सुरू आहेत.