महिला आहे म्हणून काहीही बोलणार? अॅक्शनला रिअॅक्शन मिळणारच, अबू आझमींचा कंगनाला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2020 04:24 PM2020-09-09T16:24:21+5:302020-09-09T16:26:12+5:30
मुंबईची पीओकेशी तुलना करणाऱ्या कंगना राणौतच्या कार्यालयावर आज मुंबई महानगरपालिकेने हातोडा चालवला आहे. त्यानंतर वाद अधिकच चिघळला आहे
मुंबई - शिवसेना आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत यांच्यातील वाद आता नवनवी वळणे घेत आहे. दरम्यान, मुंबईची पीओकेशी तुलना करणाऱ्या कंगना राणौतच्या कार्यालयावर आज मुंबई महानगरपालिकेने हातोडा चालवला आहे. त्यानंतर हा वाद अधिकच चिघळला असून, महाविकास आघाडी सरकारमधील घटकपक्ष असलेल्या समाजवादी पक्षाचे महाराष्ट्रातील नेते अबू आझमी यांनी आता कंगनावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.
कंगना राणौत एक महिला आहे म्हणून काहीही बोलणार का, अॅक्शनला रिअॅक्शन मिळणारच. तिने महाराष्ट्राचा अपमान केला आहे. तो सहन केला जाणार नाही. कंगना मुस्लिमांना टार्गेट करत आहे. त्यामुळे तिला बेशरम म्हणणे चुकीचे ठरणार नाही. साचलेल्या पाण्यात दगड मारला तर तरंग उठणारच. मी काहीही चुकीचं बोललेलो नाही, त्यामुळे माफी मागण्याची गरज आहे, असे मला वाटत नाही.
कंगनाने इस्लामिक डॉमिनेशन बोलणे आम्हाला टोचते. ती महिला आहे म्हणून काहीही बोलणार का. कंगनाच्या निशाण्यावर मुस्लिम आहेत. ती भाजपा आणि आरएसएसची भाषा बोलत आहे. त्यामुळेची तिला सुरक्षा मिळाली आहे. इथे लोक मारले जात आहेत त्यांना संरक्षण मिळत नाही. मात्र दिल्लीतील सरकार तिला वाय दर्चाजी सुरक्षा देत आहे. कारण ती आरएसएसची भाषा बोलत आहे, असा आरोप अबू आझमी यांनी केला.
कंगनाच्या कार्यालयावर आज बीएमसीने केली कारवाई
कंगनाच्या पाली हिल येथील कार्यालयालर पालिकेनं सकाळी कारवाई सुरू केली. अवैध बांधकाम प्रकरणी बजावण्यात आलेल्या नोटिशीला २४ तास उलटून गेल्यानं पालिकेकडून कारवाईला सुरुवात करण्यात आली. कंगनाच्या वकिलांकडून कारवाईला आक्षेप घेण्यात आला. पालिकेची कारवाई चुकीची असल्याचं म्हणत त्यांनी याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली. यानंतर झालेल्या सुनावणीत कारवाईला स्थगिती देण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. कंगणा राणौतसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.
कार्यालयावर कारवाई सुरू होताच कंगना आक्रमक
कंगनानं एका ट्विटमध्ये आपल्या कार्यालयाला राम मंदिर म्हणत त्यावर कारवाई करणाऱ्यांची तुलना थेट बाबराशी केली. 'मणिकर्णिका फिल्ममध्ये पहिल्या चित्रपटाची घोषणा झाली, त्याचं नाव अयोध्या होतं. त्यामुळे ही माझ्यासाठी केवळ एक इमारत नाही, तर राम मंदिर आहे. आज तिथे बाबर आला आहे. आज इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. राम मंदिर पाडलं जातं आहे. पण बाबर, तू हे लक्षात ठेव, तिथेच पुन्हा राम मंदिर उभारलं जाईल. जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम,' असं कंगनानं ट्विटमध्ये म्हटलं.